खासगी इलेक्ट्रिक बसमुळे लालपरी चे भविष्य धोक्यात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । इव्हेट्रान्स कंपनीने सुरत, सिल्वासा, गोवा, डेहराडूननंतर आता पुणे-मुंबई महामार्गावर धावणारी खासगी इलेक्ट्रिक बस रस्त्यावर आणली आहे. ‘पुरी बस’ नावाने ही बस धावणार असून, १५ ऑक्टोबरपासून बसच्या प्रवासी वाहतुकीला सुरुवातही झाली आहे. मात्र, दुसरीकडे एसटीच्या ताफ्यातील येणाऱ्या इलेक्ट्रिक बस गाड्यांचे सध्या फक्त निविदा प्रक्रियेवरच घोडे अडल्याने एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बस रस्त्यावर येण्यापूर्वीच खासगी इलेक्ट्रिक बस प्रवाशांना आकर्षित करण्यात यशस्वी झाल्यास एसटीच्या इलेक्ट्रिक बसचे भविष्य धोक्यात दिसून येत आहे.

इव्हेट्रान्स कंपनीची इलेक्ट्रिक बस पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर बुधवारपासून पुणे ते मुंबई दरम्यान पुरी बस नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे. आंतर-शहर सेवा भारतात प्रथमच सुरू करण्यात आली असून, १५ ऑक्टोबरपासून बसच्या नियमित प्रवास फेऱ्या सुरू केल्या आहेत.या आंतर-शहर सेवेमुळे, लांब पल्ल्याचा, शून्य-उत्सर्जन, ध्वनी प्रदूषणाविना आणि आरामदायक प्रवासाचे स्वप्न आता वास्तवात येणार असून मुंबई-पुणे स्वस्त दरात प्रवासाची इव्हेट्रान्स कंपनीने हमी दिली आहे.

 

राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणांनुसार एसटीच्या ताफ्यात एकूण दोन हजार गाड्या आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १५० बस गाड्यांची निविदा काढण्यात आली आहे. किचकट नियम व अटींमुळे आजवर कंपन्यांनी निविदेला प्रतिसाद मिळू दिलेला नाही. मात्र, आता एका कंपनीला कंत्राट दिले असून, महामंडळाच्या धक्कामार कारभारामुळे पुन्हा इलेक्ट्रिक बसगाड्या रस्त्यावर येण्यासाठी सुमारे दीड वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या आलेल्या खासगी इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांना आकर्षित करण्यास यशस्वी ठरल्यास एसटीच्या इलेक्ट्रिक बसेसच्या वाहतुकीला फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *