तुळजाभवानी मंदिर अन् शहर सुरू; परजिल्ह्यातील भाविकांना मात्र बंदी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑक्टोबर । आश्विन पौर्णिमेला म्हणजेच बुधवारी (२० ऑक्टोबर) पहाटे तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. बुधवारी दुपारी सोलापूरच्या मानाच्या काठ्यांचे शहरात आगमन होणार आहे. छबिना मिरवणुकीने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हाबंदी करण्यात आली आहे.

तुळजाभवानी मातेचा वर्षातील सर्वात मोठी यात्रा शारदीय नवरात्र महोत्सवाचा अंतिम टप्पा आश्विन पौर्णिमेला बुधवार (२० ऑक्टोबर) साजरी करण्यात येत आहे. कोजागरी पौर्णिमा मंगळवारी (१९ ऑक्टोबर) असली तरी मंदिराची पौर्णिमा बुधवारी साजरी करण्यात येत आहे. विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर तुळजाभवानी देवी नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी विसावली आहे. ५ दिवसांपासूनची मंचकी निद्रा संपवून आश्विन पौर्णिमेला तुळजाभवानी माता सिंहासनावर विराजमान होईल. जिल्हाबंदी कालावधीत जिल्ह्याबाहेरील लोकांना जिल्ह्यात येण्यास बंदी असली तरी या कालावधीत तुळजापूर शहरातील व्यवहार मात्र सुरळीत असणार आहेत. तुळजाभवानी मंदिर नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून मंदिरातील सर्वच धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडणार आहेत.

भाविक येतात पायी : या सांगता महोत्सवासाठी तालुका, जिल्ह्यासह परराज्यातून भाविक पायी चालत येऊन दर्शन घेतात. मात्र, प्रशासनाकडून भाविकांसाठी जिल्हाबंदी करण्यात आली होती.

मानाच्या काठ्यांसह छबिना : सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे बुधवारी सकाळी शहरात आगमन होईल. दिवसभर रावळ गल्ली येथील पाटील वाड्यात विसावल्यानंतर सायंकाळी मानाच्या काठ्यांचे मंदिरात आगमन होईल. रात्री उशिरा छबिना मिरवणुकीनंतर नवरात्र महोत्सवाची सांगता होईल.

यात्रा रद्द झाल्याने नाराजी
प्रशासनाने यात्रा रद्द केल्याने शहरवासीयांत नाराजी आहे. वर्षातील मोठी यात्रा असल्याने आश्विन पौर्णिमेला व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र यात्राच रद्द झाल्याने पुजारी, व्यावसायिकांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे.

ऑनलाइन दर्शन घेता येणार
परजिल्ह्यातील नागरिकांसाठी जिल्हाबंदी करण्यात आली असली तरी भाविकांना https:/www.shrituljabhavani.org/LiveShriTuljabhavani.html या लिंकवर ऑनलाइन दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा तहसीलदार सौदागर तांदळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *