कॅम्फर 4 चेंडूत 4 बळी घेणारा तिसरा टी-20 गोलंदाज

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ ऑक्टोबर । जोहान्सबर्गचा जन्म असलेल्या कर्टिस कॅम्फरने 4 चेंडूत 4 फलंदाज गारद करण्याचा पराक्रम गाजवल्यानंतर आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीतील लढतीत आयर्लंडने नेदरलँड्सचा 7 गडी राखून सहज फडशा पाडला. 4 चेंडूत 4 बळी घेणारा कॅम्फर अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा टी-20 गोलंदाज आहे. आयर्लंडने प्रारंभी नेदरलँड्सचा डाव 20 षटकात सर्वबाद 106 धावांवरच खुर्दा केला आणि प्रत्युत्तरात 15.1 षटकात 3 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे सहज लक्ष्य गाठले.

नेदरलँड्सचा डाव 106 धावांमध्ये गुंडाळण्यात कर्टिस कॅम्फर (4-26) व मार्क ऍदेर (3-9) यांचा मोलाचा वाटा राहिला. नेदरलँड्सतर्फे सलामीवीर मॅक्स ओडोडने 47 चेंडूत 51 धावांची आतषबाजी केली. मात्र, त्याला अन्य एकाही सहकाऱयाची समयोचित साथ लाभली नाही. नेदरलँड्सने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय चुकीचा ठरल्याचे नंतर स्पष्ट झाले. कॅम्फरने या लढतीत आयर्लंडतर्फे टी-20 क्रिकेटमध्ये पहिलीवहिली हॅट्ट्रिक साजरी केली.

कॅम्फरने नेदरलँड्सच्या डावातील 10 व्या षटकात कॉलिन ऍकरमन, रियान टेन डॉश्चेट, स्कॉट एडवर्ड्स, रोलेफ व्हान डेर मर्वे यांना सलग चेंडूंवर बाद करत एकच खळबळ उडवून दिली. तो यावेळी या लढतीतील दुसरे षटक टाकत होता. आपल्या पहिल्या षटकात त्याने 12 धावा दिल्या होत्या.

प्रारंभी, ऍकरमन यष्टीमागे झेलचीतचे अपील रिव्हय़ू घेतल्यानंतर यशस्वी ठरले. शॉर्टिश चेंडूवर ऍकरमनचा पूलचा फटका यावेळी चुकला होता. 2011 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध शतक झळकावलेल्या अनुभवी टेन डॉश्चेटला पुढील चेंडूवर पायचीत असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एडवर्ड्स देखील डीआरएस घेतला गेल्यानंतर पायचीत होत परतला आणि कॅम्फरने शानदार हॅट्ट्रिक साजरी केली. त्यानंतर पुढे व्हान डेर मर्वेने बाहेरील चेंडू यष्टीवर ओढवून घेतला आणि यामुळे कॅम्फरच्या सलग चौथ्या बळीवर शिक्कामोर्तब झाले.

टी-20 क्रिकेटमध्ये सलग 4 बळी घेण्याचा पराक्रम यापूर्वी लसिथ मलिंगा व रशिद खान या दोनच गोलंदाजांना गाजवता आला आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत हॅट्ट्रिक साजरा करण्याचा विक्रम करणारा कॅम्फर हा फक्त दुसरा खेळाडू असून यापूर्वी ब्रेट लीने यापूर्वी असा विक्रम केला आहे.

कॅम्फरच्या सलग 4 बळीच्या या पराक्रमामुळे नेदरलँड्सचा संघ एकवेळ 6 बाद 51 असा गडगडला. पण, सलामीवीर मॅक्स ओडोडने (51) एक बाजू लावून धरल्याने संघाला शतक साजरे करता आले. ओडोडने आपल्या 47 चेंडूंच्या खेळीत 7 चौकार फटकावले. 4 षटकांचा कोटा पूर्ण करत 26 धावात 4 बळी, असे पृथक्करण नोंदवणारा कॅम्फर 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून आयर्लंडमध्ये स्थायिक झाला आहे.

विजयासाठी 107 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना आयर्लंडने अवघ्या 15.1 षटकात सहज विजय नोंदवला. गॅरेथ डॅलेनीने 29 चेंडूत 44 धावा फटकावल्या तर पॉल स्टीर्लिंग 39 चेंडूत 30 धावांवर नाबाद राहिला.

संक्षिप्त धावफलक

नेदरलँड्स ः 20 षटकात सर्वबाद 106 (मॅक्स ओडोड 47 चेंडूत 7 चौकारांसह 51, पीटर सीलर 29 चेंडूत 2 चौकारांसह 21, कॉलिन ऍकरमन 16 चेंडूत 11. कर्टिस कॅम्फर 4 षटकात 26 धावात 4 बळी, मार्क ऍदेर 9 धावात 3 बळी).

आयर्लंड ः 15.1 षटकात 3 बाद 107 (गॅरेथ डेलॅनी 29 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 44, पॉल स्टीर्लिंग 39 चेंडूत 1 चौकार, 1 षटकारासह नाबाद 30, क्लासेन, ग्लोव्हर, सीलन प्रत्येकी 1 बळी).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *