सणांमुळे वस्त्रोद्योगात तेजी ; जानेवारीपर्यंत पुढील कामांची नोंदणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । सणांमध्ये कापड, तयार कपडे यांना मागणी वाढली आहे. कपडय़ांचे नवनवे फॅशनेबल प्रकार आल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. कोटय़वधी रुपयांची उलाढाल होऊ लागली आहे. निराशेचे वातावरण दूर होऊन आशेचे दीप उजळताना दिसत आहेत.गतवर्षी मार्च महिन्यापासून करोना संसर्ग वाढला. देशभर टाळेबंदी लागू करण्यात आल्याने सर्व प्रकारचे उद्योग बंद झाले. याचा फटका शेतीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असलेल्या वस्त्रोद्योगालाही बसला. ऑगस्टपासून उद्योग वस्त्रोद्योग थोडय़ाफार प्रमाणात सुरू झाला. ग्राहकांची क्रयशक्ती घटली असल्याने गतवर्षी दसरा-दिवाळीमध्ये अपेक्षित उलाढाल झाली नाही. कापड, तयार कपडे बाजारपेठेत आधीच्या वर्षीच्या तुलनेने खूपच कमी विक्री, व्यवहार झाले. अशातच नव्या फॅशनचे कपडे नसल्याने ग्राहकांनीही हातचे राखून खरेदी केली होती.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव दिसू लागला. थोडा आकारास येणारा उद्योग दुसऱ्या लाटेत पुन्हा बंद राहिला. गाडे रुळावर येत असतानाच ते अचानक जागीच थांबले गेले. काही ठिकाणी थोडय़ाफार प्रमाणात उद्योगांची चक्रे सुरू झाली. पण बाजाराचे चित्र निराशाजनक होते. कापूस, सूत या कच्च्या मालाचे दर वाढत गेले. सुताची विक्रमी दरवाढ आणि अनैसर्गिक टंचाईच्या झळा वस्त्र उद्योजकांना असह्य़ करणाऱ्या होत्या. दुसरीकडे, कापडाची मागणी घटली होती. निर्यात बाजारातही मंदी राहिली. कापड विक्रीचे देयके वेळेवर मिळत नसल्याने व्यवहारावर परिणाम झाला होता. आजही वस्त्र उद्योगात अनेक प्रश्न, अडचणी असल्या तरी सणांमुळे मोठा आधार मिळाला आहे.

करोनाचा संसर्ग ऑगस्ट महिन्यापासून कमी होऊ लागला. याचदरम्यान सणांचे पर्व सुरू झाले. अन्य उद्योगही नव्या उमेदीने सुरू झाले. रोजगाराच्या संधी पुन्हा उपलब्ध झाल्याने आशादायक वातावरण निर्माण झाले. ग्राहकांची क्रयशक्ती सुधारली. दिवाळीसाठी कापड, तयार कपडे (रेडीमेड) यांची विक्री धडाक्यात होऊ लागली.करोनामुळे विस्कटलेली वस्त्रे उद्योगाची घडी पुन्हा एकदा सावरली गेली. महानगरांपासून ते गावगाडय़ातील बाजारातही ग्राहकांची वर्दळ वाढली आहे. अधिकाधिक विक्री होण्यासाठी व्यापारी आकर्षक योजना घेऊन ग्राहकांसमोर जात आहेत. ‘ई- कॉमर्स’ माध्यमातून तरुणाईने खरेदीचा सपाटा लावला आहे. कापडाच्या दरातही १० ते २५ टक्के वाढ झाली आहे. तरीही ग्राहकांकडून मागणी चांगली असल्याने उत्सवी हंगामाने वस्त्र उद्योगात आशेचे दीप उजळले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *