महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑक्टोबर । ‘दिवाळीचा सण पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. ऑक्टोबरमधील रेशनचा तांदूळ अद्याप मिळालेला नाही. कोरोनामुळे सगळेच आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने दिवाळीत सर्वसामान्यांना रेशनवर गहू, तांदळासोबत तेल, साखर, डाळ दिली पाहिजे. पण अजूनही तेल, चणा डाळ आणि साखरेचा पत्ता नाही. मग आम्ही दिवाळी साजरीच करायची नाही का,’’ असा सवाल पद्मावती येथील गृहिणी मनीषा खंडाळे यांनी केला.
दिवाळीचा सण म्हटलं की, नवीन कपडे, साहित्याची खरेदी. घरात गोडधोड पदार्थ बनवून मित्र, नातेवाइकांसोबत दिवाळी साजरी करायची. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांत दिवाळी कधी आली आणि गेली, हे अनेकांना कळालेच नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बाजारपेठ गजबजली आहे. उत्साहाचे वातावरण आहे. परंतु ते श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांसाठीच. मोलमजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागविणारे सामान्य नागरिक महागाईमुळे मेटाकुटीला आले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रेशनवर धान्य मिळणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या १३ लाखांच्या जवळपास आहे. गतवर्षी केंद्र आणि राज्य सरकारने दिवाळीत रेशनवर साखर आणि चणा डाळ दिली होती. परंतु यावर्षी दिवाळी तोंडावर येऊनही सरकारकडून काही हालचाल दिसत नाही. राज्य सरकारने तातडीने रेशनवर तेल, चणा डाळ आणि साखर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वेळ मिळाला तर बघा
सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांना नागरिकांच्या प्रश्नाशी काही देणे-घेणे नाही. त्यांचे राजकारण, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महागाई कमी करण्याऐवजी ही जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर ढकलत आहेत. कोरोना आणि महागाईच्या कालावधीत सरकारने गरीब जनतेच्या अडचणींचा विचार करावा, अशी माफक अपेक्षा काही शिधापत्रिकाधारकांनी व्यक्त केली.