महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ नोव्हेबर । करोना योद्ध्यांनी आतापर्यंत लोकांना लसीकरण केंद्रात आणण्याची आणि तेथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरूक करणे आवश्यक आहे त्यासाठी आता घरोघरी लसीकरण मोहीम राबवा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
पंतप्रधान मोदी यांनी देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचा बुधवारी आढावा घेतला. कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी पंतप्रधानांनी दूरचित्र संवादाद्वारे संवाद साधला. या बैठकीला महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी करोना योद्ध्यांशीही संवाद साधला. या वेळी देशात लसीकरण धिम्या गतीने सुरू असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली आहे.
लसीकरणाला गती देण्यासाठी लोकांना जागरूक करणे गरजेचे आहे, करोना योद्ध्यांना त्यासाठी प्रचार आणि प्रसार करावा लागेल. जनजागृतीसाठी स्थानिक धार्मिक नेत्यांचीही मदत घेता येईल. त्यांची दोन मिनिटांची चित्रफीत बनवून लोकांना संदेश देता येईल अशी सूचना पंतप्रधानांनी या वेळी केली.करोना योद्ध्यांनी आतापर्यंत लोकांना लसीकरण केंद्रात नेण्याची आणि तेथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. आता प्रत्येक घरात लस, घरोघरी लसीकरण, या स्फूर्तीने प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.
संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागतो तेव्हा लोक निष्काळजी होतात, त्यामुळे घरोघरी लसीकरणासाठी घराचा दरवाजा ठोठावताना पहिल्या मात्रेबरोबरच दुसऱ्या मात्रेकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. देशात १०० कोटी लसमात्रा देण्यात आल्या असल्या तरी आपण हलगर्जी केल्यास, नवे संकट येऊ शकते, असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिला.करोना महासाथीच्या काळात देशाने समर्थपणे अनेक आव्हानांचा सामना केला आहे. ते करताना आपण नवीन उपाय शोधले आणि त्यांचा अवलंब केला, असे सांगून पंतप्रधानांनी जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये लसीकरण वाढवण्यासाठी नवीन मार्गांचा अवलंब करावा लागेल, जास्तीचे काम करावे लागेल, असे सांगितले. ‘प्रत्येकाला लस, मोफत लस’ मोहिमेअंतर्गत एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसमात्रा देण्याचा विक्रम केला आहे. यातूनच आपले सामथ्र्य दिसून येते, असेही पंतप्रधान म्हणाले.