साईबाबांच्या लक्ष्मीपूजनात आभूषणे, हिरेजडित मुकुट, समाधी व मंदिर परिसरात विद्युत रोषणाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । श्रद्धा आणि सबुरीबरोबरच सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या श्री साईबाबांच्या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे पूजन गुरुवारी सीईओ भाग्यश्री बानायत आणि त्यांचे पती प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे या उभयतांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी साईबाबा मूर्तीवर सुमारे साडेतीन कोटींची आभूषणे होती. त्यात हिरेजडित मुकुट व शाल यांचा समावेश होता. समाधी व मंदिर परिसर विद्युत रोषणाई व विविधरंगी फुलांच्या सजावटीने फुलला हाेता. दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या लक्ष्मीपूजनानंतर देशातील भाविकांचा ओघ ऑनलाइन दर्शन पास घेऊनच सुरू झाला आहे. संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, स्थानिक शिर्डीकर आणि भाविकांनी खंड पडू न देता द्वारकामाई परिसरात उत्साहात दीपोत्सव साजरा केला.

साईं निर्माण उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजयराव कोते यांनी दिलेल्या ३ लाख रुपयांच्या देणगीतून पाच टन वजनाच्या फुलांनी मंदिर परिसर व मंदिरात विविधरंगी फुलांची सजावट करण्यात आली. त्यामुळे परिसर फुलांनी व विद्युत रोषणाईने झळाळला होता. रतलाम (मध्य प्रदेश) येथील अनिल सिसोदिया यांनी प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळ्या काढल्या.

सायंकाळी पाच वाजता समाधी चौथऱ्यावर रोषणाई केलेला चौरंग, त्यावर नक्षीदार सुवर्णकलश, त्यात पारंपरिक चांदीची नाणी ,चांदीच्या कमळात उभी असलेली लक्ष्मीची व साईबाबांची मूर्ती मांडून पूजा करण्यात आली बानायत यांच्या हस्ते साईसमाधी मंदिराच्या तळघरात संपत्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर लक्ष्मीपूजनास सुरवात करण्यात आली. त्या वेळी दर्शनरांग बंद ठेवण्यात आली होती. सायंकाळी ६.१५ वाजता धूपारती झाल्यानंतर ७ वाजता दर्शन सुरू करण्यात आले.

साई मंदिरातील लक्ष्मीपूजनाला ९९ वर्षांची परंपरा आहे. १९२२ मध्ये प्रथम साई संस्थानची निर्मिती झाल्यानंतर यास सुरुवात झाली. ताे आजतागायत सुरू आहे. साई समाधीस १०२ वर्षे पूर्ण झाली असून भक्त देश-विदेशात सर्वदूर असल्याने शिर्डी हे भाविकांच्या संख्येत व दानांमध्ये देशातील तिरुपतीनंतरचे दुसरे देवस्थान आहे.

यंदा दिवाळी उत्सवानिमित्त कोते पाटील परिवाराला साई मंदिर व परिसरात विविधरंगी फुलांची सजावट करण्याचा मान मिळाला हा भाग्याचा दिवस आहे. -विजयराव कोते पाटील, संस्थापक अध्यक्ष, साई निर्माण उद्योग समूह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *