दिवाळीच्या दिवशी बसस्थानकातच चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर ।आठवडाभरापूर्वीच राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यानी संप पुकारला होता. वेतनाचा प्रश्न मार्गी लागताच संप मागे घेतल्याचे संघटनेने जाहीर केले होते. यावेळी अहमदनगर येथे एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीलाच (ST) गळपास घेऊन आत्महत्या केली होती. आज बीड जिल्ह्यात पुन्हा एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आष्टी तालुक्यातील कडा येथील बसस्थानकात या बस चालकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बीड जिल्ह्यात गुरुवारी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा अचानक संप केला. मुख्य बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी उपोषण करत ठिय्या मांडला. विभाग नियंत्रक आणि पोलीस प्रशासनाने कर्मचाऱ्यांवर संप मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता संप सुरूच ठेवला. कडा (ता. आष्टी) येथे गुरुवारी दुपारी जामखेड-पुणे बसवरील चालक बाळू महादेव कदम (३५, रा.आष्टी) याने विष प्राशन केले. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. दिवाळीच्या दिवशी ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

आष्टी येथील बाळू कदम हे तीन वर्षांपासून आष्टी आगारात चालक पदावर कार्यरत आहेत. या पूर्वी ते अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत होते. जामखेड-पुणे बस घेऊन ते निघाले. कडा बसस्थानकात बस चहापाण्यासाठी काही काळ थांबली. याच दरम्यान, चालक कदम यांनी बसस्थानक परिसरात विष प्राशन केले. त्यांनी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. कदम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्यांने विष प्राशन का केले याचे कारण मात्र अद्यापि अस्पष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *