महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । दिवाळीत फटाके फोडल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यामुळे अस्थमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना त्रास होऊ शकतो. फटाक्यांमधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे कोविडची लागण झालेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांसाठी धोका वाढू शकतो. अशा परिस्थितीत काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तानुसार, दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे निघणाऱ्या विषारी धुराचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुसांवर होतो. फुफ्फुस (Lungs Healthy) निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, जेणेकरून श्वसनाचे आजार टाळता येतील. त्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी (How To keep Your Lungs Healthy) जाणून घेऊया.
घरात दिवे आणि मेणबत्त्या लावल्याने प्रदूषण पसरते. अशा परिस्थितीत घरातील प्रदूषण टाळण्यासाठी घराच्या आत काही रोपे लावू शकता. दिवाळीनंतर घरामध्ये अधिकाधिक इनडोअर रोपे लावा ज्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत होईल. घरामध्ये एलईडी दिवे वापरावे त्याचाही फायदा होतो.
दिवाळीनंतर बाहेर पडणाऱ्यांनी मास्क वापरावा. मास्क घातल्याने तुमचे कोरोना विषाणूपासून संरक्षण तर होतेच, शिवाय प्रदूषणही सहज टाळता येते.
बाहेर धुरामुळे गुदमरल्यासारखे होत असेल तर घरातच रहा. घराच्या आत पंखे चालू ठेवा जेणेकरून हवा योग्य प्रमाणात उपलब्ध होईल आणि स्वच्छ हवा घरात प्रवेश करू शकेल. घरातील हवा खेळती राखण्याचा प्रयत्न करा.
शक्य असल्यास घरामध्ये एअर प्युरिफायरचा नक्की वापर करा. एअर प्युरिफायर घरातील हवेतून प्रदूषक, विषारी आणि ऍलर्जीन फिल्टर करतात.
श्वासोच्छवासाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी त्यांची आपत्कालीन औषधे, नेब्युलायझर आणि इतर वैद्यकीय किट नेहमी सोबत बाळगावीत. तुमचे औषध वेळेवर घेत राहा.
जर तुम्ही दम्याचे रुग्ण असाल किंवा श्वासोच्छवासाच्या आजाराने त्रस्त असाल तर तुमच्यासोबत रेस्क्यू इनहेलर नक्कीच ठेवा.
भरपूर फळे आणि भाज्या असलेले पौष्टिक अन्न खा. त्यामुळे तुमचे आरोग्य सुधारते.
हायड्रेटेड राहण्यासाठी आणि हायपर अॅसिडिटी टाळण्यासाठी भरपूर पाणी प्या.
सतत खोकला, गरगरणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्क टाळावा.