महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ नोव्हेबर । पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असताना व यावरून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असताना केंद्रातील मोदी सरकारने ऐन दिवाळीत दिलासा देणारा निर्णय घेतला. पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपयांची तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात करण्यात आली. या निर्णयानंतर भाजपशासित अनेक राज्यांनी व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. अशावेळी महाराष्ट्रासह भाजपची सत्ता नसलेल्या बहुतेक राज्यांनी मात्र याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. ( Sharad Pawar On Petrol Diesel Vat )
केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर आतापर्यंत २२ राज्ये व केंद्र शासित प्रदेशांत पेट्रोल डिझेलवरील व्हॅटमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. परिणामी पेट्रोल डिझेलचे दर बऱ्यापैकी कमी होणार आहेत. याबाबत महाराष्ट्र कोणता निर्णय घेणार याकडे आता राज्यातील वाहनधारकांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली असता शरद पवार यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. त्याचवेळी केंद्र सरकारकडूनही अपेक्षा व्यक्त केली आहे.
‘राज्यात पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी केला जाणार की नाही, याबाबत आम्हाला राज्य सरकारशी चर्चा करावी लागेल आणि सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा देईल, याची मला खात्री आहे. मात्र, त्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर जीएसटी परतावा देणे आवश्यक आहे. हा परतावा मिळाल्यास लोकांच्या हितासाठी व्हॅटबाबत राज्य सरकारला सकारात्मक निर्णय घेता येईल’, असे पवार म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत इतर राज्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी केल्या आहेत. महाराष्ट्र सरकार हे कधी ‘करून दाखवणार’?, असा सवाल महाराष्ट्र भाजपकडून विचारण्यात आला आहे. राज्य सरकारने आता व्हॅट कमी करून जनतेला आधार द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे.