महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ नोव्हेबर । १६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेसाठी सीबीएसईने ओएमआर शीटचे स्वरूप निश्चित केले आहे. पहिल्या सत्रात केवळ वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील. त्यांचे उत्तर देण्यासाठी चार पर्याय असतील. बरोबर उत्तर देण्यासाठी दिलेल्या ठिकाणावरील वर्तुळ निळ्या किंवा काळ्या बॉल पेनने भरावे लागेल. ते पेन्सिलने भरण्यास सक्त मनाई आहे. जर उमेदवाराने पेन्सिलने वर्तुळ भरले तर ते कॉपी मानले जाईल. सर्व उत्तरे भरल्यानंतर विद्यार्थ्याने बॉक्समध्ये त्याच्या/तिच्या हस्ताक्षरात लिहावे लागणार आहे, ‘मी पुष्टी करतो की, वर दिलेले सर्व तपशील बरोबर आहेत’ आणि पुढे स्वाक्षरी करावी लागणार आहे.
प्रत्येक ओएमआर शीटमध्ये ६० प्रश्नांची उत्तरे दिली जातील. पेपरमधील प्रश्नांची कमाल संख्या ४५ असेल आणि विद्यार्थ्याने ४६ व्या क्रमांकाच्या वर्तुळात रंग भरला असेल तर त्याचे मूल्यमापन केले जाणार नाही. प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर सलग चार वर्तुळे A, B, C, D असतील.विद्यार्थी जो पर्याय योग्य समजेल, त्याच्या समोरील वर्तुळ रंगवावे लागेल. त्याच्या पुढे एक बॉक्स असेल, त्यात योग्य उत्तराचे अक्षर (A, B, C, D) लिहावे लागेल. यानंतर पुन्हा एक वर्तुळ असेल, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक लिहिलेला असेल, जर प्रश्नाचे उत्तर दिले नसेल तर त्या प्रश्न क्रमांकाचे वर्तुळ रंगवावे.
ज्या पर्यायाबाबत पूर्णपणे समाधानी आणि खात्री असेल, त्याच वर्तुळात रंग भरण्याचा सल्ला मंडळाने दिला आहे. जर तुम्हाला पर्याय बदलायचा असेल तर बॉक्समध्ये योग्य पर्यायाचे अक्षर लिहावे. रंगीत वर्तुळ हा योग्य पर्याय मानला तरी तो बॉक्समध्ये अक्षर लिहावे लागेल. आणि अक्षर हेच अंतिम उत्तर मानले जाईल, परंतु पर्यायाचे वर्तुळ रंगवलेले असावे.