औरंगाबाद विमानतळाचे नाव ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ’, मंत्रिमंडळाची प्रस्तावास मान्यता

Spread the love

महाराष्ट्र 24 -मुंबई :
औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील ‘धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’ असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल.

यापूर्वी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई असे करण्यात आले आहे तर कोल्हापूर विमानतळाचे नाव छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर असे करण्यात आले आहे याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या घोषणेनंतर भाजपने मात्र टीका केली आहे. विमानतळ नामकरण झालं तरी शहराचं नामकरण करण्यापासून पळ काढला येणार नाही, अशी टीका भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. शेलार यावेळी म्हणाले की, औरंगाबाद महापालिका निवडणूक तोंडावर आहे. शहराचं नाव बदलायची वेळ आली तर महाविकास आघाडीतील इतर पक्ष विरोध करू शकतात. म्हणून शहराचं नाव संभाजीनगर करणं शक्य नाही. म्हणूम विमानतळाचं नाव बदललं. मात्र ही पळवाट आहे, असं शेलार म्हणाले. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करणं ही मागणी कायम आहे, असं देखील शेलार यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *