महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ नोव्हेबर । पावसाने उघडीप दिल्याने शहरात चिकनगुनिया या किटकजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. सप्टेंबरमध्ये याचे ८० रुग्ण होते. तर ऑक्टोबरमध्ये ही रुग्णसंख्या ३८ झाली असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
चिकनगुनियाच्या रुग्णांचा आजार बरा झाला तरीही त्यातून काहीजणांना येणारी सांधेदुखी वेदनादायक असते. रुग्ण बरा झाला तरीही पुढील दोन ते तीन महिने सांधे दुखतात. त्यामुळे आपल्या परिसरातील डासोत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे आवश्यक आहे. स्वच्छ पाण्यावर झालेल्या पैदाशीमधून हा आजार पसरतो. पावसाने आता उघडीप दिल्याने डासोत्पत्तीची ठिकाणे कमी झाली आहेत. त्याचा थेट परिणाम आता चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या कमी होण्यात झाला असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. तर पुण्यात गेल्या अकरा महिन्यांमध्ये २१८ चिकनगुनियाचे रुग्ण ढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.
असा होतो संसर्ग…
चिकनगुनिया हा अरबो या प्रकारच्या विषाणूंच्या प्रादुर्भावाने होणारा आजार आहे. एडिस इजिप्ती या डासाच्या माध्यमातून या विषाणूंचा प्रसार होतो. या डासाची मादी चावल्याने हा विषाणू शरीरात प्रवेश करतो. डास चावल्यानंतर तीन ते सात दिवसांमध्ये चिकनगुनियाची लक्षणे दिसायला सुरुवात होते.
ही आहे निदान पद्धत…
पुण्यात कोरोनाचा उद्रेकदेखील होत आहे. चिकनगुनियाची आणि कोरोनाची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सुरुवातीला कोरोना निदानाची प्रयोगशाळा चाचणी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्या चाचणीचा अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर टायफॉईड, डेंगी, चिकनगुनिया या विषाणूजन्य आजारांची चाचणी करण्यात येते.
लक्षणे…
ताप येणे, थंडी वाजणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर पुरळ येणे
घ्यावयाची काळजी…
पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून रिकामी करा. योग्य पद्धतीने झाकून ठेवा.
घराच्या भोवतालचा परिसर स्वच्छ व कोरडा ठेवा.
निरुपयोगी व टाकाऊ वस्तू छतावर आणि परिसरात ठेवू नका.
शक्यतो पूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे वापरा.