महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवसांनंतर पुन्हा हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. शहरात सोमवारी (ता. ८) १५.८ अंश सेल्सिअस इतके किमान, तर ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरात गेल्या आठवड्यात किमान तापमानात वाढ झाली होती. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहरात किमान तापमानात सातत्याने घट होत होती. मात्र नोव्हेंबरची सुरवात होताच शहरात अंशतः ढगाळ वातावरणामुळे किमान तापमान हे १८ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत पोचले. परिणामी काहीसा उकाडा जाणवू लागला होता. मात्र आता पुन्हा अशीच स्थिती कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
गुरुवारपासून (ता. ११) शहरात आकाश अंशतः ढगाळ वातावरणाचे सावट राहणार असून दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ११ नोव्हेंबरपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सध्या अनेक भागात किमान आणि कमाल तापमानात चढ- उतार कायम असून काही भागात थंडीला सुरवात झाली आहे.