महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ तब्बल २४ वर्षांनंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन देशांमध्ये २०२२ मध्ये तीन कसोटी, तीन वन डे व एकमेव टी-२० सामन्यांचा थरार रंगणार आहे.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सोमवारी याबाबत घोषणा करण्यात आली. याआधी ऑस्ट्रेलियाचा संघ १९९८ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता.
याआधी न्यूझीलंड किक्रेट संघाने या वर्षी सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तान दौऱ्यामधून माघार घेतली होती. त्यानंतर इंग्लंड ॲण्ड वेल्स क्रिकेट बोर्डानेही पाकिस्तान दौरा न करण्याचाच निर्णय घेतला. आता ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे.न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या तोंडावर माघार घेतल्यामुळे पाकिस्तान मंडळाने या दोन्ही संघांवर टीका केली होती.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन कसोटी, तीन वन डे व एक टी़-२० सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. दोन देशांमधील पहिला कसोटी सामना कराची येथे ३ ते ७ मार्च रोजी, दुसरा कसोटी सामना रावळपिंडी येथे १२ ते १६ मार्च रोजी आणि तिसरा कसोटी सामना २१ ते २५ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. ही कसोटी मालिका जागतिक विश्वचषक चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणार आहे. तसेच दोन देशांमधील तीन वन डे व एक टी-२० लाहोर येथे २९ मार्च ते ५ एप्रिल या कालावधीत पार पडेल.
श्रीलंकन संघ २००९ साली पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्या वेळी लंकन खेळाडूंच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेट ठप्प झाले. २०१५ साली झिम्बाब्वेने पाकिस्तानचा दौरा केला. हा २००९ सालानंतरचा पाकिस्तानातील पहिलाच दौरा ठरला होता.