महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ नोव्हेबर । किरकोळ माल (Retail) घेण्यापेक्षा घाऊक पद्धतीनं (Wholesale) माल घेणं स्वस्तात पडत असल्यानं अनेकजण कमी प्रमाणात कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापेक्षा अधिक प्रमाणात खरेदी करण्याला प्राधान्य देतात. काही गोष्टी आपल्याला अधिक प्रमाणात लागतात तर काही कमी प्रमाणात. त्यामुळं काही गोष्टी त्या त्या हंगामात घाऊक प्रमाणात घेतल्या जातात. उदाहरणार्थ, तांदूळ घेताना अनेकजण एक किलो, दोन किलो घेण्याऐवजी 25, 50 किंवा 100 किलो घेतात, त्यामुळं किरकोळ मालाच्या भावापेक्षा कमी दराने वस्तू मिळते. तर अनेकजण एक किलो, अर्धा किलो अशा कमी प्रमाणात माल घेणं पसंत करतात. कमी प्रमाणातील वस्तू आता पॅकिंग (Packing) केलेल्या स्वरूपात मिळतात. अशा पॅकिंग केलेल्या मालाच्या पाकीटावर त्या मालाची किंमत लिहिलेली असते. मात्र आता या किमतीबाबत नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. आता पॅकिंग केलेल्या वस्तूच्या पाकिटावर दोन प्रकारे दर लिहावा लागेल. एक दर कमाल किरकोळ किमतीचा (Retail Price)असेल आणि दुसरा दर युनिट किंमतीचा (Unit Price)असेल. म्हणजेच 5 किलो पिठाचे पाकीट असेल तर त्यावर त्याच्या किमतीसह 1 किलो पिठाचा दरही लिहिला जाईल. यामुळे ग्राहकांना इतर कंपन्यांच्या तुलनेत ते किती महाग किंवा स्वस्त घेत आहेत याची कल्पना येईल. 1 एप्रिल 2022 पासून हा नवा नियम लागू होणार आहे. टीव्ही9 हिंदीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अन्न व ग्राहक मंत्रालयानं यासाठी मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 मध्ये सुधारणा केली आहे. या नवीन नियमानुसार, कंपन्यांना पॅकेज केलेल्या वस्तूवर युनिट विक्रीची किंमत देखील लिहावी लागेल. याद्वारे ग्राहकांना खरेदीवर होणारा नफा-तोटा याची माहिती सहज मिळू शकणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुम्ही दोन कंपन्यांकडून 5 किलो पिठाची पिशवी घेतली. नवीन नियमानुसार, दोन्ही पॅकेट्सवर लिहिलेल्या युनिट विक्रीच्या (Unit Selling Price) किंमतीवरून हे कळू शकेल की कोणत्या कंपनीचा माल स्वस्त आहे आणि कोणाच्या मालाची किंमत तुमच्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय पॅकेटवर एमआरपीही (MRP)लिहावी लागणार आहे. वेगवेगळ्या कंपन्यांची एमआरपी समान असू शकते, परंतु युनिट विक्री किंमतीत फरक असू शकतो.
नवीन नियमानुसार, 1 किलोपेक्षा जास्त वजनाचे पॅकेट तयार करणाऱ्या कंपन्यांना त्यावरदेखील प्रति किलो युनिट विक्रीची किंमतदेखील लिहावी लागेल. याशिवाय एमआरपी लिहिणेही बंधनकारक आहे. उदाहरणार्थ, 5 किलो पिठाच्या पॅकेटवर 1 किलो पिठाची किंमत देखील लिहावी लागेल. ही युनिट विक्री किंमत असेल. त्या संपूर्ण पॅकेटची एमआरपी लिहिली जाईल. पॅकेट 1 किलोपेक्षा कमी असेल तरीही त्यावर प्रति ग्रॅम युनिट विक्री किंमत लिहिली जाईल. यामुळे ग्राहकांना ते प्रत्येक ग्रॅमसाठी किती पैसे देत आहेत हे समजू शकणार आहे.
कायदेशीर मेट्रोलॉजी (पॅकेज्ड कमोडिटीज) नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यासाठी, अन्न ग्राहक मंत्रालयाने कलम 2 हटवलं आहे. जुन्या नियमानुसार, तांदूळ किंवा गव्हाचे पीठ 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम आणि 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलोमध्ये पॅक करणे आवश्यक होते. आता हा नियम बदलण्यात आला असून त्यात अनेक वेगवेगळ्या वजनाच्या पॅकेटचा समावेश करण्यात आला आहे. कंपन्या वेगवेगळ्या प्रमाणात पॅकेज केलेल्या वस्तूंची विक्री करण्याचा विचार करत असून त्यासाठी त्यांनी मंत्रालयाकडून परवानगी मागितली होती. कंपन्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत तर काही नामंजूर करण्यात आल्या आहेत. मेट्रोलॉजी कायद्यातील कलम 2 रद्द करून युनिट विक्री किमतीला परवानगी देण्यात आली आहे.
एमआरपी योग्य पद्धतीनं लिहिणं गरजेचं असून, त्यात कोणतीही चूक झाल्यास नोटीस मिळू शकते. सध्या एमआरपी (3.80 रुपये) अशा पद्धतीनं लिहिली जाते. एखाद्या कंपनीने फक्त 3 रुपये लिहिल्यास त्यावर कारवाई केली जाते. आता कंपन्या भारतीय रुपयांमध्ये एमआरपी लिहू शकतात, म्हणजेच पैशाचा उल्लेख काढून टाकता येणार आहे. पॅकेज केलेल्या वस्तूंचे प्रमाण संख्या किंवा एककांमध्ये लिहिलेले असते, उदाहरणार्थ 3N किंवा 3U.याचा अर्थ एन म्हणजे संख्या आणि यू म्हणजे युनिट.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, एखाद्या कंपनीनं 3NO किंवा 3UOअसं लिहिल्यास ते नियमाचे उल्लंघन ठरेल आणि त्यासाठी नोटीस पाठवली जाईल. डब्यावर जोडी किंवा तुकड्याची संख्या लिहिणे हे देखील नियमाचे उल्लंघन होते. आता हा नियम बदलण्यात आला असून, कंपन्या आता संख्या किंवा युनिटमध्ये संख्या लिहू शकतात. तसंच कंपन्यांना बॉक्स किंवा पॅकेटवर उत्पादनाची तारीखदेखील (Date) लिहिणे अनिवार्य आहे.