महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० नोव्हेबर । नाशिक एस. टी कर्मचारी मागण्यांसाठी अधिक आक्रमक झाले असून मंगळवारी पंचवटी आगारातील कर्मचाऱ्यांनी मागण्यांसाठी मुंडन आंदोलन केले. जिल्ह्यातील १३ आगारातील कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. प्रवाश्यांचे हाल सुरू असतांना कर्मचारी संघटना संप सुरु ठेवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे.
एन.डी. पटेल रस्त्यावरील महामंडळाच्या मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळय़ा संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी धरणे आंदोलनाला सुरूवात केली. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच आपच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मागण्या मान्य न झाल्यास संघटना अधिक आक्रमक होतील, असा इशारा देण्यात आला.