महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ नोव्हेबर । एसटी कामगारांचा संप मिटावा आणि कामगारांच्या मागण्या मंजूर व्हाव्यात म्हणून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे मध्यस्थी करणार आहेत. राज ठाकरे थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे संपाचा तिढा सुटणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या 15 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यावर अजूनही तोडगा निघाला नाही. काल एसटी कर्मचाऱ्यांनी कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. राज यांनी कामगारांच्या सर्व भावना समजून घेतल्या असून आज 5.30 वाजता शरद पवार यांची भेट घेऊन कामगारांची कैफियत मांडणार आहेत. त्यामुळे शरद पवार राज यांना काय आश्वासन देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज ठाकरेंनी काय आश्वासन दिलं होतं?
काल एसटी कामगारांनी राज ठाकरे यांच्याकडे कायदेशीर बाबी मांडून त्यांच्या मागण्याही सांगितल्या. सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा सांगितलं. त्यावर राज यांनी कामगारांना मदत करण्याचं आश्वासन दिलं. मी तुमचं नेतृत्व करेल. तुमच्यासाठी सरकारशी चर्चा करेल. मात्र तुम्ही आत्महत्या करू नका, असं आवाहन राज यांनी केलं होतं. या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधला होता. राज ठाकरे ताबडतोब सरकारशी बोलणार आहेत. ते स्वत: जातीनिशी लक्ष घालून हा प्रश्न सोडवणार आहेत. एकदा सरकारशी बोलणं झालं की मग कामगारांशी बोलेन असं आश्वासन राज यांनी दिलं आहे, असं नांदगावकर यांनी सांगितलं. कोणीही आत्महत्या करू नका. आत्महत्या हा काही पर्याय नाही. आपल्याला लढाई लढायची आहे. त्यासाठी आपल्या मनगटात रक्त आणि ताकद हवी. आत्महत्या करून डाव अर्धवट सोडायचं नाही. मनसे या लढाईत सोबत राहील, असं आश्वासनही राज यांनी दिलं आहे. राज यांना सरकारमध्ये कोणाशी बोलायचं याची पुरेपूर कल्पना आहे. तेच बोलतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्हालाही माहीत आहे ते कुणाशी बोलतील, असंही नांदगावकर यांनी सांगितलं होतं.
सातवा वेतन आयोगाची मागणी
एसटी महामंडळाचं विलनीकरण करावं ही त्यांची मागणी आहे. राज्य सरकारला उच्च न्यायालयाने 12 आठवड्याची मुदत दिली आहे. समिती गठीत केली आहे. ही माहिती त्यांनी राज ठाकरेंना दिली. सरकारची भावना प्रामाणिक असेल तर राज्य सरकरच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला सातवा वेतन आयोग लागू केला तर पहिलं महत्त्वाचं पाऊल ठरेल. त्यानंतर विलनीकराची प्रक्रिया सुरू होईल असं या कामगारांचं म्हणणं असल्याचं नांदगावर म्हणाले. तसेच एसटी कामगारांसोबत मनसेचे वकीलही त्यांना कायदेशीर मदत करणार असल्यांचही त्यांनी सांगितलं होतं.
समिती समोर म्हणणं मांडा
दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगारांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. कोर्टाने समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर तुमचं म्हणणं मांडा. 12 आठवड्यानंतर समिती अहवाल देईल. तो अहवाल आल्यानंतर त्यानुसार निर्णय घेऊ असं परब यांनी आज स्पष्ट केलं.