टी – २० : महिला दिनी भारताला विश्वचषकाची भेट?

Spread the love

महाराष्ट्र 24 – मेलबर्न :
भारतीय महिला क्रिकेट संघासाठी रविवारचा दिवस मोठ्या आव्हानांचा ठरणार आहे. ८ मार्च या जागतिक महिला दिनी भारतीय महिला संघ टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणता चमत्कार करून दाखवतो याची तमाम क्रिकेटचाहत्यांना प्रतीक्षा आहे. यजमान ऑस्ट्रेलियाचा अडथळा दूर करून विजेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज आहे. या स्पर्धेच्या साखळीत भारताने सर्व लढती जिंकत अव्वलस्थान पटकाविले होते. त्यात सलामीच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. त्यामुळे भारतीय संघ विजेतेपदासाठी एक वेगळा आत्मविश्वास घेऊन मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू आहे ती त्यांनी चारवेळा जिंकलेले विजेतेपद आणि घरच्या मैदानातील लोकांचा पाठिंबा.

भारताला एक गोष्ट सतावत आहे ती, जवळपास आठवड्याभराने भारतीय संघ थेट अंतिम फेरीत खेळत आहे. इंग्लंडविरुद्धची उपांत्य झुंज पावसामुळे वाया गेल्याने भारताला या कालावधीत खेळायलाच मिळालेले नाही. भारताच्या आशा काही प्रमुख खेळाडूंवर आहेत. त्यात तडाखेबंद फलंदाज शेफाली वर्मा आघाडीवर आहे. १६ वर्षीय शेफाली ही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचे प्रमुख लक्ष्य असेल. पण, दुसरीकडे भारताच्या फिरकी आक्रमणाची चिंताही कांगारुंना आहे. या फिरकी गोलंदाजांमुळे भारताला या स्पर्धेत बहुतांश यश मिळालेले आहे. शफालीसह स्मृती मानधना व हरमनप्रीत यांच्यावरही भारताची मदार असेल. भारताच्या मधल्या फळीलाही पुरेसे योगदान द्यावे लागेल.

याआधी, तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला नमविले होते. त्यातच ते घरच्या मैदानावर खेळत आहेत. सात वर्ल्ड कप स्पर्धांपैकी सहामध्ये ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे या घडीला भारताला विजेतेपदापर्यंत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा मोठा अडथळा ओलांडावा लागेल. भारतीय संघाला एक आव्हानात्मक धावसंख्या प्रतिस्पर्ध्यांसमोर उभारावी लागेल. याआधीच्या लढतींवर नजर टाकली तर भारताला १५०पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत. तरीही भारताने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे. त्याला शिस्तबद्ध गोलंदाजी कारणीभूत आहे.

लेगस्पिनर पूनम यादवने बोटाच्या दुखापतीतून सावरत जबरदस्त पुनरागमन केले आहे. स्पर्धेत तिने सर्वाधिक ९ बळी मिळविले आहेत. ऑस्ट्रेलियाची मेगन स्कूटही आघाडीवर आहे. वेगवान गोलंदाज शिखा पांडेनेही प्रभाव पाडला आहे. तर डावखुरी फिरकी गोलंदाज राधा यादव व राजेश्वरी गायकवाड यांच्याकडेही लक्ष असेल. स्पर्धेच्या सलामीलाच पूनम यादवने ऑस्ट्रेलियन फलंदाजीला जखडून टाकले होते. तिचा सामना अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन कसा करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *