महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६नोव्हेंबर । वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता वाहनाच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राशिवाय (पीयूसी) पेट्रोल भरण्यासाठी जाणाऱ्यांना थेट 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दिल्लीतील प्रदूषणाची वाढती पातळी पाहता परिवहन विभागाने प्रदूषण करणाऱ्या वाहनांविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. सोमवारी जवळपास दिल्लीतील सर्व 400 पेट्रोल पंपांवर परिवहन विभागाचे पथक आणि 1600 नागरी संरक्षण स्वयंसेवक पथके तैनात करण्यात आली होती. ही पथके पीयूसी नसणाऱ्या वाहन चालकांकडून ऑन द स्पॉट 10 हजार रुपयांचा दंड वसूल करत आहेत.
याबाबत बोलताना वाहतूक विभागाचे सहआयुक्त नवलेंद्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पीयूसी नसलेल्यांवर कारवाई करण्यासाठी संपूर्ण दिल्लीत पथके तैनात करण्यात आली आहेत. ही मोहीम ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. आधी दिल्लीत 6 ते 8 लाखांपर्यंत बिना पीयूसी धारक वाहने असावीत असा आमचा अंदाज होता. मात्र ही संख्या 17 लाखांच्या घरात असल्याचे आता समोर आले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवण्यात येत आहे.