झी मराठी आणि स्टार प्रवाहवरील ‘या’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । छोट्या पडद्यावरील काही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. या मालिकांमध्ये झी मराठी वाहिनीवरील आणि स्टार प्रवाहावरील मालिकांचा समावेश आहे. नुकतेच या मालिकांचे शेवटचे भाग चित्रित करण्यात आले आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ ही मालिकादेखील लवकरच बंद होणार आहे.

‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत झळकत आहे. तर अभिनेते अजिंक्य देव शिवाजी महाराजांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांच्या भूमिकेत दिसत आहे. परंतु, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेला प्रेक्षकांचा मिळणारा कमी प्रतिसाद आणि कमी टीआरपीमुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेच्या जागी अभिनेता सचित पाटील याची मुख्य भूमिका असलेली ‘अबोली’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी ‘जय शिवाजी जय भवानी’ मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करण्यात येईल. ही मालिका अवघ्या चार महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

तर झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ मालिका बंद होण्याचं कारण वेगळं आहे. या मालिकेच्या कथानकानुसार मालिका फक्त १०० भागांची असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. त्यानुसार, आज ‘ती परत आलीये’ मालिकेचा शेवटचा भाग चित्रित करण्यात आला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सोबतच पुढील आठ्वड्यापासून झी मराठीवरील नवीन मालिकेचा प्रोमोही प्रेक्षकांना पाहण्यास मिळू शकतो किंवा पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेची वेळ बदलून १०.३० होण्याची देखील शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *