महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ नोव्हेबर । हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघात टी-20 मालिका सुरू आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 17 नोव्हेंबरला पार पडला. या लढतीत न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र (Rachin Ravindra) नावाच्या क्रिकेटपटूने हिंदुस्थानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या लढतीत फलंदाजीमध्ये तो विशेष कमाल दाखवू शकला नाही, मात्र आपल्या नावामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रचिन रवींद्र हा मूळचा हिंदुस्थानचा आहे आणि हिंदुस्थानी क्रिकेटपटूंसोबत त्याचे विशेष नातेही आहे. रचिन याचे नाव ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि ‘द वॉल’ राहुल द्रविड (Rahul Dravid) याच्या नावाचे मिश्रण आहे. विशेष म्हणजे रचिन याचा आज 22 वा जन्मदिवसही असून याच वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
रचिन रवींद्र याचा जन्म 18 नोव्हेंबर, 1999 ला झाला. न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टन येथे राहणाऱ्या रवींद्र वडिलांचे नाव रवी कृष्णमूर्ती आणि आईचे नाव दिपा कृष्णमूर्ती आहे. रवी कृष्णमूर्ती हे बंगळुरुमध्ये इंजिनिअरिंगचे काम करत होते. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला ते न्यूझीलंडला शिफ्ट झाले होते.
रवी कृष्णमूर्ती यांनाही खेळाची आवड आहे. टीम इंडियाचा माजी गोलंदाज आणि मॅच रेफरी जवागल श्रीनाथ हा त्यांचा चांगला मित्र आहे. 1999 मध्ये रवी आणि दिपा या दांपत्याला मुलगा झाला. त्यानंतर या दांपत्याने राहुल द्रविडच्या नावातील RA आणि सचिनच्या नावातील Chin या अक्षरांचा वापर करून त्याचे नाव रचिन असे ठेवले.
रचिन याने वयाच्या 16 व्या वर्षी न्यूझीलंडसाठी अंडर-19 विश्वचषक खेळला होता. 2016 आणि 2018 मध्ये झालेल्या विश्वचषकामध्ये तो न्यूझीलंडच्या अंडर-19 संघाचा सदस्य आहे. जूनमध्ये झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठीही त्याची निवड झाली होती, मात्र त्याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही. सप्टेंबर 2021 मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत त्याता पदार्पणाची संधी मिळाली.