![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० नोव्हेबर । राज्यव्यापी संपाचा चांगलाच फटका बसत आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे आता खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून नागरिकांची लूट चालवली आहे. खासगी प्रवासी सेवांच्या या लुटारू धोरणामुळे नागरिकांची ससेहोलपट होत आहे.
राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. ग्रामीण भागात याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. कारण खासगी प्रवासी वाहतूकदारांनी मनमानी भाडे आकारणी सुरू केली आहे. अनेक वेळा रिक्षा, डमडम, ग्रामीण भागात दुप्पट किंवा तिप्पट भाडे घेऊन प्रवाशांची ने-आण करीत आहेत. एसटी नसल्याने मिळेल त्या वाहनाने ग्रामीण भागातील प्रवासी प्रवास करत आहेत. त्यात वसईच्या औद्योगिक क्षेत्रात आसपासच्या गावांतून हजारो कामगार येत असतात. त्यांना आता दुप्पट भाडे देऊन कामावर यावे लागत आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा अर्ध्याहून अधिक भाग केवळ प्रवासावर खर्च होत आहे. जिथे १० ते २० रुपयांत काम होत होते तिथे आता ६० ते ७० रुपये एका बाजूच्या प्रवासाचे द्यावे लागत आहेत.
कोकण आणि इतर राज्यांत जाणाऱ्या खासगी बस सेवांनीसुद्धा या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची लूट सुरू केली आहे. या सेवांनी कोणतीही भाडेवाढीची अधिकृत घोषणा केली नसली तर प्रवाशांकडून वारेमाप भाडे वसुली चालवली आहे. यामुळे नागरिकांची खुलेआम लूट खासगी प्रवासी सेवांनी चालवली आहे. पर्याय नसल्याने नागरिकसुद्धा निमूटपणे ही फसवणूक सहन करत आहेत.
