Weather Update: राज्यात बरसणार पावसाच्या सरी; पुण्यासह 11 जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ नोव्हेबर । गेल्या आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणांना जोरदार पावसानं झोडपून काढलं (Rainfall in maharashtra) आहे. कालही पुण्यासह घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rainfall) कोसळला आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत अचानक पाऊस पडल्यानं घराबाहेर पडलेल्या नागरिकांची पुरती धांदल उडाली आहे. पुढील आणखी दोन दिवस राज्यात पावसाची स्थिती कायम राहणार आहे. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि घाट परिसरात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने (IMD) आज पुणे, नाशिक, अहमदनगर, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा अकरा जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासूनचं याठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यात आज दिवसभर ऊन गायब असल्याने वातावरणात गारवा होता. त्यामुळे पुढील तीन ते चार तासांत संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

याशिवाय आज मुंबई, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आज अंशत: ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतं आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याचा धोका देखील निर्माण झाला आहे.

उद्याही राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या संपूर्ण कोकण, घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने उद्या (23 नोव्हेंबर) पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या सहा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *