![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ नोव्हेबर । थंडी सुरू होण्यापूर्वीच बाजारात हुरडय़ाची आवक सुरू झाली आहे. नगर, ओैरंगाबादमधून मार्केट यार्डातील फळबाजारात बाजारात दररोज १०० किलो हुरडय़ाची आवक होत आहे. थंडी सुरू होताच हुरडा पार्टीचे बेत आखले जातात. अनेकांना शेतात जाऊन हुरडय़ाचा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हुरडय़ाची तयार पाकिटे बाजारात विक्रीस उपलब्ध करून दिली जात असल्याचे श्री शिवाजी मार्केट यार्डातील हुरडय़ाचे व्यापारी पांडुरंग सुपेकर यांनी सांगितले. अद्याप थंडी सुरू झाली नसल्याने बाजारात सध्या हुरडय़ाची आवक कमी होत आहे. घाऊक बाजारात एक किलो हुरडय़ाच्या पाकिटाची विक्री २५० ते ३०० रुपये दराने केली जात असल्याचे सुपेकर यांनी नमूद केले.
थंडीत हुरडय़ाची आवक आणखी वाढेल. त्यानंतर हुरडय़ाचे दर आणखी कमी होतील. सुरुवातीच्या टप्प्यात हुरडय़ाची आवक कमी होत असून थंडी पडल्यानंतर बाजारात दररोज एक ते दीड हजार किलो हुरडा विक्रीस पाठविला जाईल. सध्या ढाबा तसेच ग्रामीण भागातील पर्यटनास्थळांवरील उपाहारगृहचालकांकडून हुरडय़ाला मागणी आहे. येत्या पंधरा दिवसांत नगर जिल्ह्यातून हुरडय़ाची आवक वाढेल, दरवर्षी हुरडय़ाचा हंगाम तीन ते साडेतीन महिने सुरू असतो. यंदाच्या वर्षी नगर आणि ओैरंगाबाद जिल्ह्यात पीक चांगले आले आहे.
थंडीत काही जण शेतावर जाऊन हुरडा पार्टी करतात. शहरी भागात राहणाऱ्यांना बाहेर जाणे जमत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून हुरडा पाकिटात उपलब्ध करून दिला जात आहे. हुरडय़ाची पाकिटे अर्धा ते एक किलोपर्यंत उपलब्ध होतात. अनेक जण बाजारातून हुरडा पाकिटे खरेदी करतात.