महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ नोव्हेबर । अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले पीक खराब झाल्यामुळे मुंबई तसेच आसपासच्या शहरांत होणारी टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे आठवडाभरात टोमॅटोच्या दरांत प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ होऊन घाऊक बाजारातील दर ५० ते ५५ रुपये किलोवर पोहोचले आहेत.
पावसाचा परिणाम झाल्याने बंगळूरुतून वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणारी टोमॅटोची आवक पूर्णपणे थांबली आहे. नाशिक, सांगली येथूनही कमी प्रमाणात टोमॅटोचा माल येत आहे. महाराष्ट्रातील टोमॅटोचे उत्पादन कमी असतानाच गुजरात आणि मध्य प्रदेश या नजीकच्या राज्यांतून मागणी वाढल्याने एपीएमसी बाजारात आवक घटली आहे. बाजारात एरव्ही ५० ते ६० गाडय़ा भरून टोमॅटोची आवक होत होती. ती आता २० ते ३० गाडय़ांपर्यंत घसरली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे घाऊक बाजारातच टोमॅटोचे दर वधारले आहेत. मागील आठवडय़ात किरकोळ बाजारात ६० रुपये प्रातिकिलो मिळणारे टोमॅटो आता ८० रु. ते १०० रु. प्रतिकिलो असे विकले जात आहेत.
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेले टोमॅटो खराब झाले तर, अनेक ठिकाणी फळधारणेपूर्वीची फुले गळून पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि संगमनेर येथून टोमॅटोची आवक आणखी महिनाभर कमी असेल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांत टोमॅटोची नवीन लागवड करण्यात आलेली आहे, त्यामुळे नवीन टोमॅटो बाजारात दाखल होण्यासाठी महिन्याचा कालावधी उलटणार आहे.
एपीएमसी बाजारात पावसामुळे टोमॅटो आवक कमी होत आहे. त्यामुळे दरात वाढ झाली आहे. आधी ४०-४५रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता ५०-५५ रुपयांना विक्री होत आहे. आणखी एक महिना दर चढेच राहणार आहेत.