राहुल जखमी, कसोटी मालिकेतून ‘आऊट’; सूर्यकुमार यादवचा भारतीय संघात समावेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ नोव्हेबर । : भारताचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुल याच्या डाव्या पायाच्या जांघेचे स्नायू ताणले गेल्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी सुरू होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो खेळू शकणार नाही. इंग्लंड दौऱ्यात कसोटी संघाचा सदस्य राहिलेला सूर्यकुमार यादव याचा राहुलच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

बीसीसीआयने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा न्यूझीलंडविरुद्ध खेळणार नसून पुढील महिन्यात द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेआधी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी होणार आहे. राहुल हा आज ग्रीनपार्कवर झालेल्या पहिल्या सराव सत्रातही सहभागी झाला नाही. अन्य सर्वच खेळाडूंनी सराव केला. पुजारानेदेखील फलंदाजीचा सराव केला. सूर्यकुमारला दोनपैकी एका सामन्यात मधल्या फळीत संधी मिळण्याची शक्यता आहे. शुभमन गिल हा मयंक अग्रवाल याच्यासोबत सलामीला फलंदाजी करू शकतो.

तिन्ही प्रकारात खेळतो राहुल
२९ वर्षांच्या राहुलने यंदा इंग्लंड दाैरा केला. त्यानंतर आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात तो सहभागी झाला. पाठोपाठ टी-२० विश्वचषकातही खेळला. आता नुकत्याच झालेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघात तो महत्त्वाचा खेळाडू होता. इंग्लंड दौऱ्यात त्याने आठ डावांमध्ये एक शतक आणि अर्धशतकासह ३१५ धावा केल्या होत्या. ४० कसोटीत त्याने २३२१ धावा केल्या असून १९९ ही त्याची सर्वोच्च खेळी.

विराट-रोहितच्या अनुपस्थितीने धक्का
न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली आहे. आता राहुलचे जखमी होणे संघासाठी मोठा धक्का मानला जातो. विराट हा मुंबईतील दुसऱ्या कसोटीत मात्र संघात दाखल होणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिद्धिमान साहा, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *