महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ नोव्हेबर । प्रवासी, माल वाहतूक यातून मोठा महसूल मिळवणाऱया रेल्वेने आता पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी खास ऑफरची घोषणा केली आहे. नव्या योजनेअंतर्गत कोणतेही राज्य किंवा व्यक्ती ट्रेन भाडय़ाने घेऊ शकते. या ट्रेनला ‘भारत गौरव ट्रेन’ असे नाव देण्यात आले असून रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज या योजनेची घोषणा केली आहे.
देशभरात सध्या 180 ‘भारत गौरव ट्रेन’ चालवण्याची त्यांची योजना आहे. यामध्ये तीन हजारांहून अधिक कोचेस असतील. ‘भारत गौरव ट्रेन’ या योजनेअंतर्गत ट्रेन भाडय़ाने घेण्यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागणार आहे. रेल्वेने यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऑपरेटर ट्रेनचे तिकीट ठरवतील. ‘स्टेकहोल्डर्स’ या ट्रेनला मॉडेल बनवतील आणि चालवतील. ट्रेनची देखभाल, पार्ंकग आणि अन्य सुविधांचे काम रेल्वेकडे असेल. ही रेल्वे सेवा नियमित ट्रेनपेक्षा वेगळ्या असतील. विशेष म्हणजे या ट्रेन देशाची संस्कृती, वारसा दाखवणाऱया संकल्पनेवर आधारित असतील.