महाराष्ट्र 24 – श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारादरम्यान २ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आल्याची माहिती मिळत आहे. काही दहशतवादी अद्याप या भागात दडून असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुरक्षा दलातील कुणालाही या चकमकीत हानी झालेली नाही, असेही सांगण्यात आले.
एका पोलिस अधिकार्याच्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या रेबान भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नंतर इथे सुरक्षा दलाने घेराव घातला. सर्च ऑपरेशन सुरू केले. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आणि चकमकीला सुरुवात झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात अद्याप काही दहशतवादी लपून बसले आहेत. ऑपरेशन सुरू असल्याने अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाकडून शोपिया भागात इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.