नवीन व्हेरियंटची पुण्यालाही भीती? नव्यानं निर्बंध घालण्याबाबत अजित पवाराचं मोठं वक्तव्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २७ नोव्हेंबर । कोरोना महामारीला (Corona) आटोक्यात आणण्यासाठी मागील बऱ्याच काळापासून जगभरात अनेक उपाय-योजना सुरु आहेत. भारतातही युद्धपातळीवर लसीकरण सुरु आहे. पण या सर्वामध्येच आता दक्षिण आफ्रिका देशात एक नवा कोरोना व्हेरियंट (Omicron Varient) जन्माला आल्याने सर्व जगाचे टेन्शन वाढले आहे. नव्या उपाययोजनां घेऊन प्रशासन सज्ज झालं असून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेत पुणेकरांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

पुण्यातील परिस्थितीबाबत सांगताना पवारांनी महत्त्वाची माहिती देण्यासह निर्बंध घालावे लागू शकतात, तसंच परिस्थिती पाहून पुढील उपाययोजना आखल्या जातील असंही म्हटलं आहे. तसंच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांसोबत ऑनलाईन बैठकीत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.पुण्यातील कोरोना परिस्थितीबाबत सांगताना अजित पवार म्हणाले,’सध्या पुण्यातील परिस्थिती बरी आहे, पण जागतिक पातळीवर नवीन व्हेरियंट पसरतोय. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून भविष्यात नव्याने काही बंधने घालावी लागू शकतात, असं तज्ज्ञांचंही मत आहे.’

राज्याचे मुख्यमंत्री कोरोना परिस्थितीबाबत राज्यातील सर्व जिल्हाधाकार्यांची ऑनलाइन बैठक घेत असल्याचं पवारांनी सांगितलं. तसचं परदेशातून येणाऱ्या विमानांबाबत मुख्यमंत्री पंतप्रधानांसोबत होणाऱ्या ऑनलाइन बैठकीत प्रश्न उपस्थित करणार आहे. तसंच सध्यातरी विमान प्रवास करणाऱ्या डोमेस्टिक ट्रॅव्हलर्सवर कोणतेही बंधने नसून आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर केंद्र सरकारच्या सूचनांनुसार बंधने येतील, असं पवार म्हणाले.

पुणे जिल्ह्यातील करमणूकीच्या कार्यक्रमांबाबतही पवारांनी भाष्य केलं. पुण्यात कोरोनाची परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याने 1 डिसेंबरपासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु करणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. तसंच भिमथडी जत्रेला डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात परवानगी देण्यात आली असून सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारखे कार्यक्रमही सर्व नियमांचे पालन करून होणार असल्याचंही ते म्हणाले

पुण्यातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जंबो कोवीड हॉस्पिटल्सचे स्ट्रक्चर आहे तसेच ठेवण्यात येणार आहे. असंही पवार यांनी यावेळी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *