महाराष्ट्र 24 – मुंबई –
अधिक व्याजाच्या लालसेपोटी राज्य सहकारी बँकेने कॉलमनी म्हणून गुंतवणूक केलेले सुमारे 800 कोटी रुपये येस बँकेत अडकल्याचे उघडकीस आले आहे. क्लीअरिंगची होम बँक म्हणून ओळख असलेल्या राज्य बँकेचीच एवढी मोठी रक्कम अडकल्याने राज्यातील सहकारी बँकांना मोठा हादरा बसला आहे. एखाद्या बँकेकडे अधिक रक्कम असल्यास दुसर्या बँकेने मागणी केल्यानंतर कॉलमनी म्हणून चोवीस तासांसाठी ही रक्कम दिली जाते. त्या बदल्यात बँकेला व्याज मिळते. रक्कम देणार्या बँकेने मागणी करण्याच्या आतमध्ये दुसर्या दिवशी सकाळी बँकेच्या खात्यात जमा केली जाते. रक्कम मागणारी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याची रिझर्व बँकेकडून पडताळणी केली जाते. येस बँकेच्या बाबतीतही तोच प्रकार घडला होता.
रिझर्व बँकेने होकार दिल्यानंतर राज्य सहकारी बँकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटने येस बँकेला 800 कोटी रुपये कॉलमनी म्हणून दिले होते. 5 मार्च रोजी सकाळी 10 च्या दरम्यान हा व्यवहार झाला होता, अशी माहिती सूत्राने दिली. मात्र दुपारी रिझर्व बँकेने येस बँकेवर निर्बंध आणल्याने राज्य सहकारी बँकेच्या नफ्याची ही रक्कम आता अडकली आहे. 31 मार्चच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने बँकेच्या नफ्यावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन राज्य बँकेच्या अधिकार्यांना दरदरून घाम फुटला आहे. राज्य सहकारी बँकेकडून राज्यातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या आणि अन्य उद्योगाला मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम एसमध्ये अडकल्याने बँकेचे पुढील व्यवहार संथगतीने चालण्याचा धोका निर्माण झाला आहे. 31 मार्च रोजी आर्थिक ताळेबंद असल्यामुळे ही रक्कम तातडीने मिळावी यासाठी राज्य बँकेच्या अधिकार्यांनी रिझर्व बँकेत खेटे मारण्यास सुरुवात केली आहे.मात्र रिझर्व्ह बँकेने काखा वर केल्यामुळे हे अधिकारी हतबल झाले असल्याचे समजते.
सहकारी संस्थांची शिखर बँक असलेल्या या बँकेवर अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र, रिझर्व बँकेच्या आदेशानुसार काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासक नियुक्त केले होते. प्रशासक हटविण्यासाठी राष्ट्रवादीने आडमार्गे अनेकदा प्रयत्न करून पाहिले, परंतु अद्याप यश आले नाही. आता यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या हातात आयतेच कोलीत आले आहे. तसेच सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे या व्यवहारावरून दोन्ही सदनामध्ये जोरदार हंगामा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सहकारी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक चिंतेत पडले आहे.