महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात गाजर सहज विकत मिळतात. एक कप गाजरामध्ये 25 कॅलरी, 6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2 ग्रॅम फायबर, 3 ग्रॅम शुगर, 0.5 ग्रॅम प्रथिने शिवाय जीवनसत्त्व ए, के, सी, पोटॅशियम, फायबर, कॅल्शियम आणि आयर्न अशी सर्व प्रकारची जीवनसत्त्वे असतात. अँटिऑक्सिडंटचा उत्तम स्त्रोत असलेले गाजर शारीरिक आरोग्याकरिता अत्यंत गुणकारी मानले जाते. ऋतुमानानुसार थंडीच्या दिवसांत गाजर खाल्ल्याने काय फायदे होतात ते पाहूया …
डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
गाजरामध्ये बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते. यामुळे प्रखर उनापासून डोळ्यांचे रक्षण होते. तसेच मोतिबिंदू आणि डोळ्यांच्या इतर समस्याही कमी होतात. बिटा कॅरोटिन म्हणजेच जीवनसत्त्व ए असते. पिवळ्या गाजरामध्ये ल्युटिन हा घटक असतो. सर्व वयोगटातील लोकांना होणारे डोळ्यांचे आजार कमी करण्यासाठी गाजर गुणकारी आहे.
कर्करोगाचा धोका कमी होतो
गाजरात असणारे अँण्टीऑक्सीडंट शरीरातील फ्री रेडिकल्ससोबत लढण्यासाठी मदत करते. कॅरोटीनॉइड आणि एंथोसायनिन हे अँण्टीऑक्सीडंट गाजरात असतात. कर्करोगाशी लढण्यासाठी हे अँण्टिऑक्सिडंट अत्यंत आवश्यक असतात. कॅरोटीनॉइडमुळे गाजराचा रंग नारंगी आणि पिवळा होतो. एंथोसायनिनमुळे गाजराचा रंग लाल होतो.
ह्रदयविकाराकरिता गुणकारी
ह्रदयाचे आरोग्य सुधारण्याकरिता गाजर अत्यंत फायदेशीर आहेत. गाजरातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, तर यातील फायबरमुळे वजन कमी होण्यासाठी फायदा होतो. लाल रंगाच्या गाजरामध्ये लाइकोपीन असते. यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारायला मदत होते.
रोगप्रतिकारक्षमता वाढते
रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी गाजर फायदेशीर आहे. ज्यांचे पोट साफ होत नाही त्यांनी कच्चे गाजर खावे. गाजरातील फायबरमुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते, तर कॅल्शियम आणि जीवनसत्त्व ‘के’मुळे हाडे मजबूत होतात.
मधुमेहावर नियंत्रण
मधुमेहाच्या रुग्णांना गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजरातील फायबरमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते तसेच जीवनसत्त्व ए आणि बीटा कॅरोटिनमुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.