देशात सध्याच्या घडीला ‘ओमायक्रॉन’चे किती रुग्ण?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । सध्या संपूर्ण जगावर करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनने भीतीचं सावट निर्माण केलं असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन (B.1.1.529) सर्वात प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे.

आरोग्यमंत्र्यांनी राज्यसभेत बोलताना सांगितलं की, “करोना संकटात आपण खूप काही शिकलो असून आज आपल्याकडे अनेक संसाधनं, प्रयोगशाळा आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना आपण करु शकतो. दरम्यान आजच्या घडीला देशात करोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या कोणत्याही रुग्णाची नोंद झालेली नाही. तसंच हा नवा विषाणू देशात येऊ नये यासाठी संभाव्य प्रत्येक काळजी घेतली जात आहे”.

अफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ‘ओमायक्रॉन’ या करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा फैलाव वेगाने वाढत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. यामुळे दक्षिण आफ्रिकेतील विमानसेवेवर परिणाम झाला असून कडक लॉकडाउनची भीती सतावत आहे. दक्षिण अफ्रिकेतील विमानांवर बंदी घालण्यात आल्याने विमानतळावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दक्षिण अफ्रिकेतील शास्त्रज्ञांनी गुरुवारी करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणू ओमिक्रॉनचा शोध लागल्याचं जाहीर केलं. यानंतर धास्तावलेल्या देशांनी येथून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली. यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि युरोपमधील काही देशांचा समावेश आहे.

करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या भीतीपोटी दक्षिण अफ्रिकेतील देशांतून होणाऱ्या हवाई वाहतुकीवर बंदी घालू नये, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने रविवारी जगभरातील देशांना केले. प्रवासविषयक निर्बंध टाळण्यासाठी विज्ञानविषयक आणि आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन डब्ल्यूएचओचे अफ्रिकेसाठीचे विभागीय संचालक मात्शिदिसो मोएती यांनी सर्व देशांना केले.

‘प्रवासविषयक निर्बंध करोना विषाणूचा फैलाव काहीसा कमी करण्यात भूमिका बजावू शकतात; मात्र त्यांच्यामुळे जीवन आणि उपजीविका यांवर फार मोठा बोझा पडतो’, असे त्यांनी एका निवेदनात सांगितले. ‘निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली, तर ते अनावश्य किंवा अनाहुत नसावे, तर आंतरराष्ट्रीय आरोग्यविषयक नियमावलीनुसार शास्त्रीय आधारावर असावेत’, अशी अपेक्षा मोएती यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *