महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । आगामी दोन ते तीन दिवसांमध्ये कार कंपन्यांसाठी फ्लेक्स फ्युअल इंजिन (Flex-Fuel Engine) अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली. फ्लेक्स इंजिनमध्ये एकापेक्षा अधिक इंधनाचा वापर करता येऊ शकतो. भारत दरवर्षी ८ लाख कोटी रूपयांच्या पेट्रोलियम उत्पादनांची आयात करतो. जर भारताची पेट्रोलियम उत्पादनांवरचं अवलंबत्व कायम राहिलं तर आयातीचं बिल हे २५ लाख कोटी रूपयांवर पोहोचेल, असंही गडकरी म्हणाले.
“पेट्रोलियम आयात कमी करण्यासाठी पुढील दोन तीन दिवसांमध्ये एका आदेशावर स्वाक्षरी करण्यात येणार आहे. या अंतर्गत कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिनचा वापर करणं अनिवार्य असेल,” असं गडकरींनी नमूद केलं. टोयोटा मोटर कॉर्पोरेशन, मारुती सुझुकी आणि ह्युंदाई मोटर्स इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वाहनांमध्ये फ्लेक्स फ्युअल इंजिनचा वापर करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी सांगितलं.
फ्लेक्स इंधन हे पेट्रोल आणि मिथेनॉल किंवा इथेनॉल यांच्या संयोगातून बनविण्यात येते. भारतात पेट्रोलमध्ये ८.५ टक्के इथेनॉलचे ब्लेंडिंग करण्यात येते. हे प्रमाण दोन वर्षांमध्ये २० टक्के करण्याचे लक्ष्य सरकारनं ठेवलं आहे. ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती होते.
फ्लेक्स इंजिन असलेल्या गाड्या सध्याच्या गाड्यांपेक्षा निराळ्या असतात. बाय फ्युएल इंजिनमध्ये निरनिराळे टँक असतात. परंतु फ्लेक्स फ्युएल इंजिनमध्ये एकाच टँकमध्ये अनेक प्रकारच्या इंधनाचा वापर करता येतो. अशा प्रकारची इंजिन निराळ्या प्रकारे डिझाईन करता येतात. इथेनॉलची किंमत ६० ते ६२ रूपये प्रति लीटर असेल असंही यापूर्वी गडकरींनी सांगितलं होतं.