अवकाळी पावसाने हजारो मच्छीमार बोटी समुद्रकिनारीच; मासेमारीवर परिणाम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगडात तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. समुद्रही खवळलेला असल्याने मच्छीमारीसाठी खोल समुद्रात जाण्यास मच्छीमार बोटींना प्रशासनाने बंदी घातली आहे. त्यामुळे अलिबागसह जिल्ह्यातील समुद्रकिनारी हजारो मच्छीमार बोटी विसावल्या आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे मच्छीमार बांधव हा हैराण झाला असून मच्छीमारीवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधव हा आर्थिक संकटात सापडला आहे.

निसर्ग, तोक्ते चक्रीवादळ त्याचबरोबर पडत असलेला अवकाळी पाऊस, बदलते वातावरण याचा फटका हा मासेमारी व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. सततच्या या नैसर्गिक संकटामुळे मच्छीमार बांधव हा मेटाकुटीस आला आहे. पावसाळा संपल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून मासेमारी व्यवसायाला सुरुवात झाली होती. मासेमारी सुरू झाल्यानंतरही पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू येथे आलेल्या वादळाचा फटका हा जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायला बसला होता. त्यानंतर सुरळीत व्यवसाय सुरू झाल्यानंतर पुन्हा 1 डिसेंबर पासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे पुन्हा मच्छीमारी बंद झाली.

रायगडात तीन दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर असल्याने समुद्रात मच्छीमारी करण्यास प्रशासनाने बंदी केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन बंदरात हजारो मच्छीमार बोटी मच्छीमारानी किनाऱ्याला नांगर टाकून ठेवल्या आहेत. त्यामुळे पुढील तीन दिवस मासेमारी बंद राहणार असल्याने मासळी बाजारात आवक घटणार आहे. याचा मच्छीमाराना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *