महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ डिसेंबर । मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई आज करण्यात आली आहे. बेशिस्त वर्तवणूक व अनियमितता याकरिता ही कारवाई केली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश देण्यात आला आहे. आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे.
परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचे उल्लंघन केल्यामुळे देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्या विरोधामध्ये चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींकरिता राज्याच्या गृह विभागाने त्यांच्या विरोधामध्ये विभागीय चौकशी लावण्यात आली होती. या अगोदर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, असे सांगितले होते. “बेशिस्त वर्तन आणि अनियमितता याकरिता परमबीर सिंग यांच्याविरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत.
त्यांच्यावर निलंबनाची कारवाईची प्रक्रिया देखील सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले होते. राज्य सरकार आपले काम करत आहे, असे सांगत गृहमंत्री वळसे- पाटील म्हणाले की, परमबीर सिंग मुंबईमध्ये परतल्यावर त्यांनी त्याविषयी सरकारला कळवले नाही. तसेच त्यांनी होमगार्डच्या महासंचालक पदाचा पदभार देखील स्वीकारलेला नाही.
तसेच परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार देखील घोषित करण्यात आले होते. असे असतानाही त्यांना शासकीय गाडी आणि इतर शासकीय सुविधा कसे काय दिले गेले याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत, ते चुकीचे आहे. ते कामावर नाहीत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरी देखील ते गाडी वापरत आहेत. हे चुकीचे आहे आणि याविषयी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.