‘ओमिक्रॉन’शी लढणार बूस्टर डोस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ डिसेंबर ।‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या नवीन प्रकाराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतातही बूस्टर डोस देण्याचा विचार केला जात आहे. देशातील 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना बूस्टर डोस देणे आवश्यक असल्याची शिफारस इंडियन सार्स-कोविड-2 जेनेटिक कंसोर्शियमने (आयएनएसओसीओजी) केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा सर्वाधिक धोका असलेल्यांवर आता अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही सदर प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

केंद्र सरकार गंभीर रुग्ण आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी लसीच्या अतिरिक्त डोसवर (बूस्टर डोस) नवीन धोरण तयार करत आहे. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट हे धोरण दोन आठवडय़ात तयार करेल. तसेच देशातील 44 कोटी बालकांच्या लसीकरणासाठी नवीन धोरण आणणार असल्याचे देशाच्या कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी म्हटले आहे. भारतात जानेवारी महिन्यापासून लसीकरणाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे पहिल्या टप्प्यात डोस घेतलेल्यांना आता 9-10 महिने उलटून गेले आहेत. त्यामुळे आता दुसरा डोस घेतल्यानंतर 6 ते 9 महिने झाले असतील त्यांना बूस्टर डोस द्यावा. कारण सात-आठ महिन्यात ऍन्टिबॉडीज कमी किंवा कमकुवत झाल्या असतील, असे मत पाटणा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या मायक्रो व्हायरोलॉजी विभागाचे माजी मुख्य प्रोफेसर डॉ. सत्येंद्र सिंग यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत अद्याप फारशी माहिती स्पष्ट झालेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातील शास्त्रज्ञ या व्हायरससंदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच लसीकरणाबाबतचे निर्णय विज्ञान आणि वैज्ञानिक निकषांच्या आधारावर घेतले जातात. तथापि, लसीचा आणखी एक डोस किंवा बुस्टर डोस द्यावा की, नाही? याबाबतही वेगवेगळी मतमतांतरे असलेली दिसतात. लस किंवा उपचाराबाबत असे निर्णय सर्व पैलू, वैज्ञानिक पुरावे, संशोधन लक्षात घेऊन घेतले जातात.

ओमिक्रॉनच्या संशयितांमध्ये वाढ

कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट भारतातही दाखल झाला आहे. कर्नाटकातील दोन रुग्णांमध्ये या विषाणूची लक्षणे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र, राजस्थान, नवी दिल्ली आदी ठिकाणीही काही संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जयपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जण कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून ते नुकतेच दक्षिण आफ्रिकेला जाऊन परतले होते. तसेच दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात एकूण 10 जणांना ओमिक्रॉन प्रकाराची लागण झाल्याच्या संशयावरून दाखल करण्यात आले आहे. ‘आम्ही एकूण 10 जणांना दाखल केले असून त्यांना नवीन ओमिक्रॉन प्रकाराची बाधा झाल्याचा संशय आहे. त्याच्या जीनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी शुक्रवारी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *