46 वर्षीय बाधित डॉक्टरने स्वतःच सांगितली ओमिक्रॉनची लक्षणे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरिअंटमुळे भारतासह जगभरात खळबळ उडाली आहे. आता भारतातही ओमिक्रॉन येऊन धडकला आहे. कर्नाटकात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण या आठवड्यात आढळून आले. यांपैकी एक 46 वर्षीय डॉक्टर आहे. पण संक्रमित डॉक्टर आता ठीक आहे. त्यांनी स्वत:च सांगितले, की त्यांना कुठलाही अधिक त्रास नाही. दक्षिण आफ्रिकेत आढळलेला हा नवा व्हेरिअंट अतिशय धोकादायक असून तो अत्यंत वेगाने पसरतो, असे सांगितले जात आहे. अशा स्थितीत त्याची लक्षणेही वेगळी आहेत का? असा प्रश्नही केला जात आहे.

टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना संक्रमित डॉक्टरने सांगितले, की आजारापेक्षाही अधिक वेदनादायक गोष्ट म्हणजे घरात बंद राहणे आहे. डॉक्टरने सांगितले की, कोरोनाची लागण झाल्याचे त्यांना समजताच त्यांनी सर्वप्रथम स्वतःला क्वारंटाइन केले. त्यांची पत्नी आणि मुलांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या बाधित डॉक्टर पूर्णपणे बरे आहेत. पण, ते अजूनही रुग्णालयातच आहे.

ते ओमिक्रॉनच्या लक्षणांबाबत बोलताना म्हणाले की, त्यांना प्रचंड बॉडी पेन होत होते. त्याचबरोबर त्यांना हलक्या स्वरुपाचा तापही होता, पण श्वास घेण्यास त्रास होत नव्हता. त्याची ऑक्सिजनची पातळीही सातत्याने सामान्य होती. 21 नोव्हेंबरपासून त्यांना ताप जानवू लागला होता. त्यांनी दुसऱ्याच दिवशी आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब दिले. डॉक्टर म्हणाले, मला सर्दी नव्हती. तसेच मला केवळ 100 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत ताप होता.

डॉक्टर संक्रमित आढळून आल्यानंतर पहिल्या दिवशी घरीच थांबले. यानंतर त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर पुढे म्हणाले, मला २५ नोव्हेंबरला मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा डोस देण्यात आला. याचा मला प्रचंड फायदा झाला. दुसऱ्या दिवशी माझ्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नव्हते. काही दिवसांपूर्वी एका व्हायरोलॉजिस्टने सांगितले होते की, मोनोक्लोनल अँटीबॉडीज किंवा कॉकटेल उपचारांचा ओमिक्रॉनवर फारसा परिणाम होत नाही.

रुग्णालयात डॉक्टरला दाखल करण्यात आले, पण याच दरम्यान पेशाने डॉक्टर असलेल्या त्यांच्या पत्नीलाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. यानंतर त्यांनी २६ नोव्हेंबरला चाचणी करायचे ठरवले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली. पण नंतर त्या आरटी-पीसीआर चाचणीत निगेटिव्ह आल्या. तसेच, गुरूवारी जेव्हा डॉक्टरांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समजले, तेव्हा त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *