महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । समुद्री चक्रीवादळ जवाद रविवारी दुपारपर्यंत पुरीच्या किनारपट्टीवर धडकण्यापूर्वी गहिऱ्या दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊन कमकुवत होण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार, यापूर्वी ‘गुलाब’ व ‘यास” या चक्रीवादळांचा तडाखा सोसलेल्या या पूर्व किनारपट्टीच्या राज्यांना दिलासा मिळण्याची आशा आहे. जवाद वादळ हळूहळू कमकुवत पडत असून पुढील १२ तासांत ते उत्तरेकडे सरकू शकते. यानंतर ते उत्तरेकडे ओडिशाच्या किनाऱ्याकडे खोल दाबाच्या क्षेत्रात बदलून पुरी किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकते. एनडीआरएफची ६४ पथके तैनात आहेत. पुरीच्या किनारपट्टी भागात वादळामुळे रात्री उशिरा पावसाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ७०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
रेल्वेगाड्या, नेट परीक्षा रद्द : मुसळधार पावसाचा इशारा आहे. रेल्वेने ७५ गाड्या रद्द केल्या आहेत. विद्यापीठांनी अनुदान आयोगाची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) आणि भारतीय परराष्ट्र व्यापार संस्थेची रविवारी होणारी प्रवेश परीक्षा ओडिशा, आंध्र व पश्चिम बंगालमधील काही केंद्रांवर रद्द केली.