महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .५ डिसेंबर । कर्नाटक, महाराष्ट्र व गुजरातपाठोपाठ आता दिल्लीतही ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. 37 वर्षांच्या या रुग्णाला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच हा रुग्ण टांझानियावरून परतला होता. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विदेशातून आलेल्या 12 जणांचे नमुणे जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवले होते. त्यातील 11 रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले असून त्यातील एकाचा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. त्या व्यक्तीशी संबंधित सहा जणांचे देखील जिनोम सिक्वेंसिंग केले आहे.
महाराष्ट्रातील डोंबिवलीतील 33 वर्षीय तरुणाला संसर्ग झाल्याचे चाचणीत शनिवारी स्पष्ट झाले. हा तरुण दक्षिण आफ्रिकेतून दुबई आणि दिल्लीमार्गे आला होता.गेल्या 24 तासांत मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दक्षिण आफ्रिका आणि इतर आफ्रिकन देशातून आलेल्या 3839 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. तसेच इतर देशांतून आलेल्या 17107 प्रवाशांपैकी 344 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी केली.1 डिसेंबरपासून विमानतळावर आठ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
एकीकडे ओमायक्रोनचे संकट असतानाच कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणि मृत्यू संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे देशातील सहा राज्यांना केंद्राने अॅलर्ट दिला आहे. त्यात केरळ, जम्मू-कश्मीर, तामीळनाडू, ओडिशा, कर्नाटक आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे.