महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये ज्या अभिनेत्याला देवाची उपमा दिली जाते तो अभिनेता म्हणजे थलाईवा अर्थात रजनीकांत. (Rajinikanth) आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्याविषयींच्या काही रंजक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. जगातील आजच्या घडीला जे प्रभावी अभिनेते आहेत त्यामध्ये रजनीकांत यांच्या नावाचा समावेश करता येईल. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांचे योगदान भरीव आहे. काही महिन्यांपूर्वी त्यासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. बस कंडक्टर म्हणून सुरुवात करणाऱ्य़ा रजनीकांत आज टॉलीवूडचे सुपरस्टार आहेत.
मेगास्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करणं हे अनेक अभिनेत्यांचे स्वप्न असते. रजनीकांत हे त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे तर सामाजिक, राजकीय भूमिकांसाठी देखील ओळखले जातात. त्यामुळे चाहत्यांच्या मनात त्यांच्याविषयी नितांत आदरही आहे. जगभर त्यांचा चाहतावर्ग पसरला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा अन्नाथे नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यालाही नेहमीप्रमाणे चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 12 डिसेंबर 1950 रोजी बंगलोरमध्ये रजनीकांत यांचा जन्म झाला. आज ते 71 वर्षांचे झाले आहेत. त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रजनीकांत हे सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. जेव्हा त्यांचा रोबोट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्या चित्रपटांवरुन तयार झालेले मीम्स हा सर्वांच्या चर्चेचा विषय होता.