महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । देशात ओमायक्रॉन संसर्गाचे रुग्ण आढळणे सुरूच आहे. आता आंध्र प्रदेश, चंदीगड आणि केरळातही रविवारी ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र व कर्नाटकात एक-एक रुग्णाची भर पडली. अोमायक्रॉन संसर्गित रुग्ण आढळणाऱ्या राज्यांची संख्या आता ८ तर एकूण रुग्णांची संख्या ३८ झाली आहे.
इटलीहून २२ नोव्हेंबर रोजी चंदीगडला नातलगाला भेटण्यासाठी आलेल्या तरुणात ११ डिसेंबरला रात्री ओमायक्रॉनचा संसर्ग आढळला. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. त्याच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र त्याला ११ दिवसांपासून खबरदारी म्हणून रुग्णालयात ठेवले आहे. आयर्लंडहून मुंबई व नंतर विशाखापट्टणमला पोहोचलेल्या ३४ वर्षीय विदेशी व्यक्तीतही संसर्ग आढळला. मुंबईतील तपासणीत त्याचा अहवाल निगेटिव्ह होता. नंतर २७ नोव्हेंबरला त्याला प्रवासाची परवानगी देण्यात आली. तेथे दुसऱ्यांदा चाचणी केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. ११ डिसेंबरला अहवाल निगेटिव्ह आला. यूकेमधून केरळला पोहोचलेल्या एका व्यक्तीतही संसर्ग आढळला. रविवारी आढळलेल्या तिन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई-पुण्यापाठोपाठ नागपुरातही आढळला ओमायक्राॅनचा रुग्ण
नागपूर | मुंबई, पुणे व ठाण्यापाठोपाठ नागपुरातही कोरोनाच्या ओमायक्राॅन व्हेरिएंट संसर्गाचा रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशातून आलेल्या ४० वर्षीय प्रवाशाची विमानतळावर आरटीपीसीआर केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. तेव्हापासून संबंधित व्यक्ती विलगीकरणात होती. त्याचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगकरिता पाठवण्यात आले होते. त्याच्या अहवालात या व्यक्तीला ओमायक्राॅनचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर नागपूर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णाची संख्या १८ वर पोहेचली आहे. त्यापैकी ७ जण ओमायक्रॉनमुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये १०, मुंबईत ४, पुण्यात १ आणि डोंबिवलीमध्ये १ रुग्ण आढळला होता. सर्वच रुग्णांत सौम्य लक्षणे होती. कोणातही गंभीर लक्षणे दिसली नाहीत.
निगेटिव्ह रिपोर्ट असला तरी ८ व्या दिवशी चाचणी
अॅट द रिस्क देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही सात दिवस होम क्वॉरंटाइन राहावे लागेल. आठव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर करावा लागेल. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर नेहमीप्रमाणे बाहेर ये-जा करू शकतात. विमानतळावर आरटीपीसीआर पाॅझिटिव्ह आल्यानंतर ताबडतोब रुग्णालयात भरती केले जाईल.
रुग्णांची स्थिती: फार गंभीर लक्षणे नाहीत ; एक-दोन डोस घेणाऱ्यांसह न घेणारेही रुग्ण
– राजस्थान : ओमायक्रॉन ९ रुग्ण भरती. अहवाल निगेटिव्ह आले. गुरुवारी सर्वांना सुटी.
– आंध्र प्रदेश : आयर्लंडमधून भारतात आलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीत कोणतीही लक्षणे नव्हती. ११ डिसेंबरला अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
– दिल्ली : रुग्णालयात भरती दोन रुग्णांमध्ये एक रुग्ण झिम्बॉम्ब्वे तर दुसरा रुग्ण दक्षिण आफ्रिकेहून आला आहे. एकाला सुटी.
– गुजरात : ओमायक्रॉनच्या तीन रुग्णांत दोन रुग्ण जामनगर, एक सौराष्ट्रात सापडला. शनिवारपर्यंत तिन्ही रुग्ण भरती होते.
– कर्नाटक : तीन रुग्णांपैकी दोघांना सुटी. द. आफ्रिकेतून आलेल्या रुग्णावर उपचार सुरू.
– चंदीगड : इटलीहून भारतात आलेल्या २० वर्षीय तरुणाला ११ डिसेंबरला संसर्ग आढळला. त्याने लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.