महाराष्ट्र २४- मुंबई :मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावरील आणखी एका रेल्वे स्टेशनचं लवकरच नाव बदलण्यात येणार आहे. लोकल आणि एक्स्प्रेसच्या वाहतुकीमुळे प्रवाशांनी गजबजलेल्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या नामांतराला ठाकरे सरकारनं मंजुरी दिली आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ स्टेशन करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केल्यानंतर हे नाव प्रत्यक्षात येईल.
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याच्या ठरावाचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, असं म्हणत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई सेंट्रलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे आणि ग्रँट रोडला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याची रामदास आठवलेंची सूचना केली होती. मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वेवरील महत्वाचे टर्मिनस असल्यामुळे या टर्मिनसला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावी, अशी मागणी मागील 15 वर्षांपासून रिपब्लिकन पक्षाने केली होती. मात्र, आता अचानक राज्य सरकारने मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याचा ठराव संमत केल्याने रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मुंबई सेंट्रलला नाना शंकर शेठ यांचे नाव देण्याच्या ठरावाचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी ना रामदास आठवले यांनी केली आहे. नाना शंकर शेठ यांचे नाव मुंबई सेंट्रल ला देण्या ऐवजी ग्रँट रोड रेल्वे स्टेशन ला नाना शंकर शेठ यांचे नाव द्यावे तसेच मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी सूचना रामदास आठवले यांनी राज्य सरकारला केली आहे. या सुचनेसाठी लवकरच रामदास आठवले केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार आहेत.