महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल ८१ वा वाढदिवस साजरा झाला. त्या निमित्तानं देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज याबाबत विचारलं असता त्यांनी आपल्या पवारांबद्दलचं आपलं मत मांडलं. ‘पवार साहेबांना पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Raj Thackeray Praises Sharad Pawar)
नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तरं दिली. शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा दिल्या असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर स्तिमहास्य करून त्यांनी पवारांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘काल पवार साहेबांचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा झाला. पण महाराष्ट्र गेली साठ वर्षे शरदचंद्रदर्शन करतोय. साठ वर्षे राजकारणात सातत्य ठेवणं ही काही साधी, सोपी, सरळ गोष्ट नाही. या वयात सर्व व्याधींवर मात करून ते ज्या प्रकारे फिरताहेत, जसं काम करताहेत ही गोष्ट विलक्षण आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
‘राजकीय मतभेद असतात तो भाग वेगळा आहे. मतभेद ही गोष्ट असतेच, परंतु जे काही चांगलं आहे ते आहेच. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारा महाराष्ट्र आहे. मी वयानं पवार साहेबांपेक्षा बराच लहान आहे. त्यामुळं कौतुक हा शब्द वापरणं बरोबर होणार नाही, पण जेवढी त्यांच्या गुणांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले.