महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । एसटी कर्मचाऱयांचा संप सुरू असला, तरी सातारा विभागातून स्वारगेट, मुंबई व बोरिवली या ठिकाणी एसटी बसेस धावत आहेत. दिवसभरात विविध मार्गांवर बसेस रवाना होत असल्याने बस स्थानकात प्रवाशांची वर्दळ वाढली आहे.
एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, पारगाव-खंडाळा, महाबळेश्वर, कोरेगाव, मेढा, वडूज, फलटण, दहिवडी या 11 आगारांतील ग्रामीण भागासह शहर भागातही एसटी वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. महामंडळाने कर्मचाऱयांना कामावर हजर राहण्याच्या नोटिसा बजाविल्यानंतर विभागीय कार्यालय, कार्यशाळा व 11 आगारांतील कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पुणे-मुंबई मार्गावर ‘शिवशाही’ बसेस चालविल्या जात आहेत. या बसेसना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वारगेट मार्गावर सातारा बस स्थानकातून दर अर्ध्या तासाला ‘शिवशाही’ बसेस जात आहेत. ‘लाल परी’च्याही ग्रामीण भागात कमी प्रमाणात फेऱया होत आहेत. ‘शिवशाही’ बसेसच्या सातारा आगारातून बोरिवली येथे 2, मुंबई 6, तर स्वारगेटला 23 फेऱया झाल्या. याचबरोबर ‘लाल परी’च्याही पाच फेऱया स्वारगेटला झाल्या. तारळे येथे एक फेरी गेली. दिवसभरात सातारा विभागातून 73 बसेसच्या सुमारे 143 फेऱया झाल्या असल्याची माहिती विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली.