ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; शाळा-महाविद्यालये बंद म्हणजे बंद!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ : मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेत राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केले आहेत. याबाबत आरोग्य विभागाने उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शालेय शिक्षण विभाग, व्यवसाय व प्रशिक्षण आयुक्त यांना परिपत्रकाद्वारे कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
सरकारने शुक्रवारी (ता.13) कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरातील चित्रपटगृह, नाट्यगृह, तरणतलाव, व्यायामशाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर शनिवारी (ता.14) सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार राज्यातील सर्व महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती क्षेत्रातील सर्व प्रकारच्या सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालयात आणि त्यासोबतच आयटीआय आदी सर्व शैक्षणिक संस्था या 31 मार्चपर्यंत बंद ठेवाव्यात असे आदेशात म्हटले आहे. राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सोबतच विविध महाविद्यालयांच्या ही परीक्षा सुरू आहेत.
या परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात यावेत असाही निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार या परीक्षा घेतल्या जाव्यात असे या आदेशात म्हटले आहे. मात्र या परीक्षा घेताना एखादा आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, यासाठी आवश्‍यक ती दक्षता आणि खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्था प्रमुखांना देण्यात याव्यात असे स्पष्ट म्हटले आहे.
शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा आदेश दिला असतानाच आरोग्य विभागाने दहावी-बारावी आणि विद्यापीठांच्या परीक्षा सुरू ठेवण्याचीही सुचना केली आहे. यासाठी विशेष खबरदारी घ्यावी असेही आदेश विभागाने राज्यातील शिक्षण विभागासोबत संबंधित विभागाला दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *