महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ डिसेंबर । रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहली (Virat kohli) या दोन भारतीय कर्णधारांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा माध्यमं आणि सोशल मीडियावर सुरु आहे. या कथित वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी आपलं मत मांडलं आहे. “खेळापेक्षा कोणी मोठा नाही. संबंधित क्रीडा संघटनेने या बद्दल माहिती दिली पाहिजे” असं क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले.
“खेळ सर्वोच्च आहे आणि खेळापेक्षा कोणी मोठा नाही. काय सुरु आहे? कुठला खेळाडू कुठल्या खेळात आहे, या बद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही. संबंधित फेडरेशन आणि संघटनेचं हे काम आहे. त्यांनी माहिती दिली, तर चांगलं होईल” असं अनुराग ठाकूर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.
मागच्या आठवड्यात भारताच्या वनडे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर विराट कोहलीने आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक मागितला. तेव्हापासून भारताच्या या दोन्ही आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, रोहितची वनडे कर्णधारपदी निवड झाल्यामुळे विराट कोहली नाराज असल्याची निव्वळ अफवा आहे. असं काही नाहीय.
रोहितची वनडे कर्णधारपदी निवड होण्याआधीच विराटने ब्रेक मागितला होता. आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहली पत्रकार परिषद घेणार आहे. त्यावेळी या संपूर्ण वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्डकपनंतर विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडणार असल्याचे जाहीर केले, तेव्हापासूनच संघात सर्वकाही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरु आहेत.
रविवारी मुंबईत सराव करताना रोहित शर्माला दुखापत झाली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला तो मुकणार आहे. कसोटीत कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. विराटला कौटुंबिक कारणांसाठी ब्रेक हवा आहे. पण भारताचे हे दोन्ही प्रमुख खेळाडू महत्त्वांच्या मालिकांमध्ये खेळत नसल्याने वेगळाच अर्थ काढला जात आहे.