महाराष्ट्र २४ ऑनलाईन : नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर देशभर पसरत असल्याने केंद्र सरकारने सीमा सील करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून (ता.१५) पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमारच्या सीमेवरील वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश जारी होईपर्यंत भारताच्या शेजारील देशांच्या सीमेवरुन प्रवास करण्यास मनाई असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. तथापि, काही चेक पोस्टवरून आवश्यक वाहतुकीस परवानगी दिली जाईल.
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सतत वाढत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ३१ रुग्ण आहेत. देशात विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे आणि १० रुग्ण बरे झाले आहेत. केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबाला चार लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तसेच आता राज्य सरकार आपत्ती निवारण निधीचा वापर कोरोनासाठी करू शकतात.
सीमा सील करण्याशिवाय सरकारने असे म्हटले आहे की, जर संयुक्त राष्ट्रातील एखादी व्यक्ती किंवा राजनैतिक अधिकारी वैध व्हिसा घेऊन येऊ इच्छित असेल तर त्यांना अटारी-वाघा सीमेवरुन परवानगी दिली जाऊ शकते. तथापि, त्याला स्क्रीनिंगदेखील करावं लागेल. भारत-बांगलादेश क्रॉस बॉर्डवरील रेल्वे आणि बसेस १५ एप्रिलपर्यंत थांबविण्यात येतील, असे सरकारने आधीच सांगितले आहे. ती तारीख आणखी वाढविली जाऊ शकते.
या व्यतिरिक्त ५ हजारहून अधिक लोक मरण पावले आहेत. अमेरिकेने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, युरोपच्या देशांना प्रवासासाठी लावण्यात आलेली बंदी आता ब्रिटन आणि आयर्लंडलाही लागू होईल. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांची संख्या १२०० च्या वर पोहोचली आहे. स्पेनने अमेरिकेनंतर आणीबाणी जाहीर केली आहे.जगातील बरेच मोठे नेते आणि नामांकित व्यक्तीही या संक्रमणाला बळी पडले आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांनीही सावधगिरी बाळगण्यासाठी आपली कोरोना चाचणी घेतली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.