![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । संपात सामिल झालेल्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत २५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर काही कर्मचाऱ्यांना आठ दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.
महामंडळाने दिलेल्या माहीतीनुसार, बुधवारी २७ एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे नोटीस बजावण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २५७ झाली आहे. एसटीतील १११ कर्मचाऱ्यांना बुधवारी निलंबित करण्यात आले. त्यामुळे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही एकूण १० हजार ४५१ झाली आहे.
कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद नाही
निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रथम पंधरा दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. त्यानंतर तीन वेळा सुनावणीसाठीलाही हजर राहण्याच्या सूचना असतात.
त्यालाही प्रतिसाद न दिल्यास बडतर्फीची कारवाई करण्याच्यादृष्टीने कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. त्यानुसार आतापर्यंत रोजंदारीवरील २ हजार ४३ कर्मचाऱ्यांचीही सेवा समाप्ती केली आहे.
बदल्यांचे सत्र…विलीनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या संपात सामिल असलेल्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणीही बदल्या केल्या जात आहेत. बुधवारी ५२ कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. एकूण २ हजार ६२४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.