महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱया दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक आज जाहीर झाले. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल आणि दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. यंदा मात्र ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. पेपरपॅटर्न आणि मूल्यमापन पद्धत ही शिक्षण मंडळाच्या प्रचलित पद्धतीप्रमाणेच असेल, असेही गायकवाड यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शाळांमधून परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक दिले जाणार आहे. दरवर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुमारे 32 लाखांच्या दरम्यान विद्यार्थी बसतात. या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्षा गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. त्यासोबत त्यांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या काळातील परिस्थिती लक्षात घेता आरोग्याची काळजी घेत परीक्षेची तयारी करण्याचे आवाहन केले.